नगर पालिकेच्या गलथान कारभाराविराेधात नागरिक आक्रमक; तीन दिवसांत समस्या न सुटल्यास ‘कुलूपबंद’ चा इशारा..!
Sep 11, 2025, 19:13 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील पैनगंगा नदी परिसरातील शितला माता मंदिराजवळील पाइपलाइनचा व्हॉल्व्ह अनेक वर्षांपासून लिक असून, त्यातून वाहणारे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर व धार्मिक स्थळांच्या मार्गावर साचत आहे. परिणामी भाविक, नागरिक आणि विद्यार्थी यांना दररोज घाण पाण्यातूनच जावे लागत आहे. रस्त्यावर सतत पाणी वाहत असल्याने शेवाळ तयार होऊन अपघाताच्या घटना वाढल्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर मंगळवारी मेहकर नगरपरिषदेविरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले.
या समस्येबाबत नागरिकांनी, तसेच शितला माता व चंदनशेष मंदिरांच्या विश्वस्त मंडळींनी वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी व निवेदने दिली होती. मात्र प्रशासनाने केवळ तात्पुरता तोडगा काढल्याने नागरिकांचा रोष वाढत गेला. सणासुदीच्या दिवसातही दूषित पाण्यातून जाण्याची वेळ येत असल्याने नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
रास्तारोकोमध्ये शिवचंद्र मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद भिसे, शिंदेसेनेचे शहर उपाध्यक्ष संदीप तटे, सामाजिक कार्यकर्ते नितीन तपे, तसेच सेना शहराध्यक्ष नंदू बंगाळे, गोलू मुळे, मंगेश काटकर, गणेश शेळके, आशिष जाधव, शुभम मोरे यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान नगरपरिषद प्रशासनाविरोधात आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. नगरसेवक रामेश्वर भिये यांच्या उपस्थितीत आंदोलक व पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. शेवटी नगरपरिषदेकडून समस्येचे कायमस्वरूपी निवारण तीन दिवसांत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, मागणी पूर्ण न झाल्यास ‘नगरपरिषदेला कुलूप ठोक आंदोलन करू’, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.