‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’च्या जयघाेषाने दुमदुमला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; अनुसुचीत जमातीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाने काढला भव्य माेर्चा !
जिजामाता प्रेक्षागार येथून माेर्चास सकाळी प्रारंभ झाला. सुरूवातीला बंजारा समाजातील मान्यवरांनी या माेर्चाला संबाेधीत केले. त्यानंतर हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला.यावेळी गावागावातून बंजारा समाज बांधव या माेर्चात सहभागी झाले हाेते. यावेळी आरक्षण देण्याच्या मागणीसह विविध घाेषणा देण्यात आल्या. बंजारा समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण लगू आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर आंध्र प्रदेशातून राज्यात समावेश झालेल्या नांदेड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीला पूर्वी आंध्रप्रदेशात अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत होते. तसेच सीपी अॅण्ड बेरार प्रोविन्स मध्ये येणाऱ्या बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते. आजपर्यंत नेमण्यात आलेल्या विविध आयोगांनी बंजारा समाजात संवैधानिक आरक्षणास पात्र आहे अशी शिफारस केली आहे. त्यामुळे बंजारा समाज आरक्षणास पात्र ठरतो. मात्र आरक्षण न मिळाल्याने समाज वंचित असून, मोठा अन्याय झाल्याने समाजात असंतोष पसरला आहे. त्यामुळे आरक्षण लागू करण्यात यावे, अन्यथा यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.