सण-उत्सव एकोप्याने साजरे करा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन; आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव आणि ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरा करण्यात येणार आहे. हे सण राष्ट्रीय उत्सव समजून एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. पराग नवलकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, “गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे आपले सण असून एकात्मतेची भावना जपून साजरे करावेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परस्परांमध्ये एकतेची भावना ठेवावी.” त्यांनी भरकटलेल्या तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, सोशल मीडियाचा गैरवापर टाळावा असेही आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद-विवाद, अफवांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. सण-उत्सवात दारूबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की, गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हा सण आनंदाने आणि शांततेत पार पडावा. “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला जाईल. सोशल मीडियावरील अपप्रचार, आक्षेपार्ह संदेश रोखण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल. शांतता समिती सदस्यांनीही या बाबतीत सजग राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सभेत उपस्थित शांतता समिती सदस्यांनी सणांच्या दरम्यान आवश्यक सोयी-सुविधांबाबत सूचना मांडल्या आणि गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद शांततेत आणि एकोप्याने साजरा करण्याचे आश्वासन दिले. या वर्षी जिल्ह्यात एकूण १,३८५ सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन होणार असून त्यापैकी ४७० मंडळे शहरी भागात तर ९२५ मंडळे ग्रामीण भागात असतील. यापैकी ३०७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिली.

सभेनंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी श्रीगणेशोत्सव समन्वय समितीची बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.