कालवा आरसीसी टर्फचे काम निकृष्ट; शेतकऱ्यांचा संताप; पेनटाकळी कालव्याला तडे, टेंडर सार्वजनिक करण्याची मागणी; माजी सरपंचांचे उपोषण...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पेनटाकळी कालवा क्रमांक १ ते ११ किमी या टप्प्यातील आरसीसी टर्फचे काम शासनाकडून मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सध्या अंदाजे १ ते ३ किमीपर्यंत पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.या आरसीसी टर्फचे काम दर्जेदार करण्याची मागणी करीत दुधा येथील माजी सरपंच एकनाथ जगन्नाथ सास्ते यांनी उपोषण सुरू केले आहे. 
कालव्याच्या आरसीसी टर्फच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर चुरी (डस्ट) वापरण्यात आल्याने अवघ्या काही दिवसांतच टर्फला तडे गेले आहेत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शासनाचा निधी वाया जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दुधा, रायपूर, ब्रह्मपुरी, पेनटाकळी, सोनारगव्हाण व सावत्रा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिगाव प्रकल्प – मेहकर कार्यालयाकडे लेखी मागणी सादर करत, या कामासाठी शासनाने मंजूर केलेली निविदा (टेंडर) सर्व शेतकऱ्यांना पाहण्यासाठी सार्वजनिक करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

दरम्यान, हिवरा आश्रम परिसरात पेनटाकळी प्रकल्पातून निघालेल्या कालव्याचे आरसीसी टर्फचे काम सुरू असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या गैरप्रकाराविरोधात संबंधित गावचे सरपंच यांनी संतप्त भूमिका घेत काम तात्काळ बंद पाडले असून, जोपर्यंत दर्जेदार व नियमानुसार काम होत नाही, तोपर्यंत उपोषणावर बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दुधा येथील माजी सरपंच एकनाथ जगन्नाथ सास्ते यांनी कालव्याचे काम थांबवले असून उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणामुळे सिंचन विभाग व ठेकेदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कारवाई होणार का, की शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.