बुलढाणा नगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; भाजपचे आक्षेप स्विकारले; आता ६ ऑक्टाेबरला निघणाऱ्या नगराध्यक्ष आरक्षण साेडतीकडे इच्छुकांचे लक्ष...
१९ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत नागरिक व राजकीय पक्षांकडून तब्बल १५ आक्षेप दाखल करण्यात आले होते. १ ते ८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी अंतिम आराखडा सार्वजनिक करण्यात आला.
एका प्रभागाची व दोन नगरसेवकांची वाढ
पूर्वी बुलढाणा नगरपरिषदेची एकूण सदस्यसंख्या ३१ (२८ निवडून + ३ सहनियुक्त) होती. मात्र शहराच्या लोकसंख्येत झालेल्या वाढीमुळे यंदा एका प्रभागाची वाढ करण्यात आली असून दोन नगरसेवकांची भर पडली आहे. आता नगरपरिषदेत एकूण १५ प्रभाग व ३० नगरसेवक असतील.
साेमवारी निघणाऱ्या आरक्षण साेडतीकडे लागले लक्ष
आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर केंद्रीत झाले आहे. भाजपकडून अंतिम रचनेतील दुरुस्ती आपली राजकीय भूमिका बळकट करणारी असल्याचा दावा केला जात आहे, तर विरोधकांकडून या बदलांवर पडद्यामागील दबावाचे आरोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.२०१६ मधील निवडणुकीनंतरचा नगरपरिषदेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२१ रोजी संपला आणि त्यानंतर शहरात प्रशासक राज सुरू आहे. परिणामी नागरिकांच्या स्थानिक समस्या अद्याप प्रलंबितच राहिल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया सुरू झाली आहे. बुलढाण्यातही पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.