“बुलडाणा लाइव्हचा इम्पॅक्ट!अखेर निळेगाव रस्त्याचे रखडलेले काम सुरू; बातमीच्या सोळाव्या दिवशी प्रत्यक्ष कामास प्रारंभ...
Nov 12, 2025, 17:41 IST
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): “आमच्या चिमुकल्यांना खड्डेमय रस्त्यामुळे शाळेत यायला-जायला त्रास होतो, आमचा तेवढा रस्ता तरी करा…” — अशा व्यथित आवाजात निळेगाववासीय मागणी करत होते. अखेर बुलडाणा लाइव्हने घेतलेल्या बातमीचा परिणाम झाला असून, रखडलेले रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे.
खामगाव तालुक्यातील म.स. प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेले निळेगाव हे अवघ्या ५० ते १०० घरांचे छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या दोनशेच्या आत असून, खामगाव–मेहकर या मुख्य रस्त्यापासून निळेगाव सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असली तरी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विहीगाव, रामनगर किंवा खामगाव येथे जावे लागते.
मात्र गेल्या वर्षभरापासून गावात जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. खाजगी वाहनांनी प्रवास करताना चिमुकल्यांना सतत धक्के बसत होते. कमी लोकसंख्या असल्याने या गावातील विकासकामांकडे नेहमीच दुय्यम दृष्टिकोनातून पाहिले जाते, अशी ग्रामस्थांची नाराजी होती.
या समस्येबाबत बुलडाणा लाइव्हने पंधरा दिवसांपूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर संबंधित विभागाला जाग आली असून, निळेगाव रस्त्याच्या कामाला आज — सोळाव्या दिवशी — प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
ग्रामस्थांनी या कामाच्या प्रारंभाचे स्वागत करत बुलडाणा लाइव्हचे आभार मानले असून, “माध्यमांची ताकद खऱ्या अर्थाने आमच्या गावाने अनुभवली,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
