Buldana Live Special : पावसाच्‍या सावटात उद्यापासून विधि मंडळाची समिती जिल्ह्यात! विविध योजनांसह बिंदूनामावलीची घेणार झाडाझडती; जिल्हा प्रशासनासह यंत्रणांच्या “दिल की धडकन तेज’

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः एकदा दौरा तहकूब तर चारवेळा वेळापत्रकात बदल झालेली महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती अखेर उद्या, 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात डेरेदाखल होत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील व विविध पक्षीय 16 समितीच्या पूर्वतयारीने घायाळ जिल्हा प्रशासन व यंत्रणा आता समितीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.19 विभागप्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या दिल …
 
Buldana Live Special : पावसाच्‍या सावटात उद्यापासून विधि मंडळाची समिती जिल्ह्यात! विविध योजनांसह बिंदूनामावलीची घेणार झाडाझडती; जिल्हा प्रशासनासह यंत्रणांच्या “दिल की धडकन तेज’

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः एकदा दौरा तहकूब तर चारवेळा वेळापत्रकात बदल झालेली महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती अखेर उद्या, 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात डेरेदाखल होत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील व विविध पक्षीय 16 समितीच्या पूर्वतयारीने घायाळ जिल्हा प्रशासन व यंत्रणा आता समितीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.19 विभागप्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या दिल की धडकन तेज झाल्याचे चित्र आहे.

ही 16 सदस्यीय समिती 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय विभाग व कार्यालयातील अनुसूचित जाती समितीच्या कल्याणकारी योजना आणि बिंदूनामावलीची झाडाझडती घेणार आहे. समितीत विधानसभा व परिषदेचे विविध पक्षीय आमदार बालाजी किनीकर, संतोष बांगर, यशवंत माने, किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाने, टेकचंद सावरकर, नरेंद्र भोंडेकर, अरुण लाड, राजेश राठोड, विजय गिरकर, बाळाराम पाटील, राजू आवळे यांचा समावेश आहे.

याशिवाय त्यांच्यासमवेत अधिकारी, कर्मचारी, स्वीय सहायक, प्रतिवेदक आदींचा ताफा राहणार आहे. त्यांच्यासाठी 16 संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना समितीचे आगमन ते प्रस्थानपर्यंत समिती समवेत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय गंभीर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे. दौरा निश्चित होताच जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी तात्काळ सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात समितीच्या अनुषंगाने जय्यत पूर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर आजवरच्या काळात किमान 4 बैठका झाल्या आहेत.

दृष्टीक्षेपात दौरा कार्यक्रम…
प्रारंभी घोषित कार्यक्रमात चारदा बदल झाले असून सुधारित दौरा पुढीलप्रमाणे आहे. सोमवारी सकाळी 9 ते 9.30 दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे खासदार, आमदार, जि.प. अध्यक्ष व सभापती यांच्या समवेत चर्चा. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात 13 पालिका व नगरपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालयातील एससी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी तथा कल्याणकारी योजनांवर चर्चा होणार आहे. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी याच विषयांवर चर्चा होईल. या बैठका जिल्हा परिषदेत पार पडणार आहे. यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान समिती शासकीय व अनुदानित शाळा, वसतिगृहे, जि.प., नगर परिषदाकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना व बुलडाणा पालिकेच्या दलित वस्ती योजनेच्या कामांची पाहणी करणार आहे. ]

5 तारखेला याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात क्रमाक्रमाने महावितरणच्या बुलडाणा शहर व ग्रामीण कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा, उप वन संरक्षक कार्यालयांची झाडाझडती घेण्यात येईल. दुपारी 3 नंतर समिती शाळा व वसतिगृह यांना भेटी देऊन योजनांची पाहणी करणार आहे. 6 तारखेला रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात डीएसपी, एसटी महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क, एमआयडीसी क्षेत्रीय कार्यालय व जिल्हा उधोग केंद्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत बिंदूनामावली संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. समारोपात दुपारी अडीच ते पाच वाजेदरम्यान जिल्हा कचेरीत अनुसूचित जाती उप योजना सन 2021- 2022 जिल्हा वार्षिक योजना आराखडा, समितीने विविध ठिकाणी दिलेल्या बैठका आणि भेटीच्या अनुषंगाने मॅरेथॉन आढावा बैठक पार पडेल.