Big Coverage… ढग फुटल्याने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार!; नद्यांनी पात्र सोडले, शेतांत पाणीच पाणी; पिकांचे ९० टक्क्यांवर नुकसान, एक जण वाहून गेला; देऊळगाव राजा-चिखली मार्ग बंद!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल सायंकाळपासून बुलडाणा जिल्ह्यावर अक्षरशः भलामोठा ढग फुटला आहे. आज, २८ सप्टेंबरला दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, पिके तर पार कामातून गेली आहेत. ९० टक्क्यांच्यावर सर्व पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यंत्रणेला दिले आहेत. नदी, नाल्यांना पूर आला असून, नदीकाठावरील धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे. बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि. मी. पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरले असून, काही मध्यम प्रकल्पांचा सांडवा प्रवाहीत झाला आहे, तर काही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूर नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात आज दुपारी चारला 96.55 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे 19 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे. नदीपात्रात 71 हजार 846 क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रती सेकंद सुरू आहे.
पलढग धरण ओव्हर फ्लो; मोताळा, नांदुरा, मलकापूर तालुक्यातील २० गावांना सतर्कतेचा इशारा
ज्ञानगंगा अभयारण्यात असलेले निर्सगरम्य पलढग धरण ओव्हर फ्लो झाले आहे. आज दुपारी पलढग मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नदीकाठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी असलेली मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग मलकापूरचे उपविभागीय अधिकारी म. ना. मोहिते यांनी केले आहे. तारापूर, कोथळी, सुलतानपूर, वरुड, तांदुळवाडी, शेंबा बुद्रूक, शेंबा खुर्द, टाकरखेड, डोलखेड, निमखेड, पिपळखुंटा खुर्द, पिंपळखुटा बुद्रूक, लासुरा, वरखेड, बुटी, वडनेर, सानपुडी, डिघी, चांदुरबिस्वा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नळगंगा धरण 80 टक्के भरले असल्यामुळे नळगंगा नदी काठावरील भोरटेक, पिंपळपाटी, शेलापूर, घुसर ता. मोताळा, दाताळा, निंबारी, वाकोडी, कुंड खुर्द, कुंड बुद्रूक, तांदुळवाडी, म्हैसवाडी, नरवेल, तालसवाडा (ता. मलकापूर) या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सरासरी 36.2 मि.मी पावसाची नोंद
जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.2 मि. मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यंत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 128.79 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर पाठोपाठ सिंदखेड राजा 111.45 टक्के, देऊळगाव राजा 103.70 तर लोणार तालुक्यात आतापर्यंत 107.11 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस असा ः (कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची.) बुलडाणा : 89.7 मि. मी. (880.5), चिखली : 29.3 (761.9), देऊळगाव राजा : 45 (730.7), सिंदखेड राजा : 16.2 (893.7), लोणार : 15.1 (934.6), मेहकर : 26.4 (1080.2.), खामगाव : 36.4 (697.5), शेगाव : 33.3 (524.4), मलकापूर : 28.8 (567.4), नांदुरा : 48.1 (608.9), मोताळा : 48.6 (642.9), संग्रामपूर : 24.7 (638.1), जळगाव जामोद : 28.4 (487.5). जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9448.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 726.8 मि. मी. आहे. आतापर्यंत सर्वात कमी 487.5 मि.मी. पावसाची नोंद जळगाव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 68.95 आहे. तसेच जिल्ह्यात 9 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा मंडळात 88.8, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चांधई (ता. चिखली) 65.3, निमगाव ता. नांदुरा 67.3, धामणगाव बढे ता. मोताळा 70.8 मि.मी. या अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जलसाठ्यांत वाढ
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा असा : (आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी) ः नळगंगा : 55.01 दलघमी (79.35), पेनटाकळी : 45.50 दलघमी (75.85), खडकपूर्णा : 84.39 दलघमी (90.36), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.77), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 10.18 दलघमी (67.74), तोरणा : 7.66 दलघमी (97.12) व उतावळी : 19.79 दलघमी (100). जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.50 मीटर असून जीवंत पाणीसाठा 98.77 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4.50 वाजता 5 दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत नदीपात्रात एकूण 120.00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 25 सें. मी.ने 34.65 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 19 दरवाजे 50 सें.मी. उघडल्यामुळे नदीपात्रात 37940.7 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाच्या सांडव्यावरून 112.67 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच पलढग प्रकल्पाच्या सांडव्यावरून 20 सें. मी. उंचीवरून 47.29 क्युमेक विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पेनटाकळी प्रकल्पातून पूर नियंत्रणासाठी सायंकाळी 4.45 वाजता आणखी दोन वक्रद्वार 25 सें.मी. उघडून नदीपात्रात 181.167 क्युमेक विसर्ग करण्यात येत आहे.
नुकसानीच्या पंचनाम्यांचे पालकमंत्र्यांकडून आदेश
पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांना आलेल्या पुरामुळे चिखली – खामगांव रस्त्यावर पेठ जवळ पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. नांद्राकोळी पुलावरून पाणी असल्यामुळे रायपूर – बुलडाणा वाहतूकही बंद आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करू नये. आपले वाहन पुलावरील पाण्यातून काढू नये, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले आहे. जिल्ह्यातील पैनगंगासह अन्य नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काही गावे बाधीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाणा 88.8 मिली, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चिखली तालुक्यातील चांधई 65.3, नांदुरा तालुक्यातील निमगांव 67.3, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे 70.8 मिली अशाप्रकारे अतिवृष्टी झाली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी. जेणेकरून पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानची माहिती घेऊन पंचनामे करतील व शेतकऱ्यांना मदत देतील. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीला द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. काही नागरिकांच्या घरांचीही पडझड आली आहे. त्यामुळे संसार उघड्यावर आले आहे. अशा बाधित नागरिकांना तातडीने मदत करावी. तसेच काही शेतकऱ्यांच्या जनावरे सुद्धा वीज पडून किंवा पुरात वाहून मृत पावली आहे. बाधित शेतकऱ्यांनाही मदत द्यावी लागणार आहे. तरी यंत्रणांनी पंचनामे पूर्ण करावे, असे आदेशही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
नांद्रा कोळीचे दोघे नाल्यात गेले वाहून; एकाने बाभळीला धरून वाचवले प्राण, दुसरा अद्याप बेपत्ताच
नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) येथील एक तरुण आणि एक वृद्ध व्यक्ती शेताजवळील नाल्याला आलेल्या पुरात काल, २७ सप्टेंबरला रात्री वाहून गेले होते. त्यातील तरुणाने वाहून जात असताना सातशे मीटरवरील बाभळीच्या झाडाला धरल्याने प्राण वाचले. रात्रभर तो थंडीत कुडकुडत तिथेच होता. आज सकाळी या दोघांच्या शोधार्थ निघालेल्या ग्रामस्थांना तो गारठलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यानंतर तातडीने शेकोटी करून त्याला उष्णता देण्यात आली. सध्या त्याची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. वृद्धाला शोध मात्र सकाळी ११ पर्यंतही लागलेला नव्हता. राहुल दशरथ चौधरी (२७) व भगवान लक्ष्मण गोरे (५५, दोघे रा. नांद्राकोळी) हे दोघे वाहून गेले होते. पैकी राहुल सहिसलामत आहे. सुनील रामकृष्ण काळवाघे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरातून गाडी काढण्याच्या नादात ते वाहून गेले होते. शेडपासून १०० मीटर अंतरावर त्यांची मोटारसायकल नाल्याच्या कडेला आढळली. भगवान गोरे यांचा शोध गावकरी व प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. सायंकाळी सहापर्यंतही त्यांचा शोध लागला नव्हता. सरपंचपती संजय काळवाघे, उपसरपंच मनोज जाधव, पोलीस पाटील संदीप हुडेकर यांच्यासह ग्रामस्थ त्यांचा शोध युद्धपातळीवर घेत आहेत. मात्र सतत पाऊस चालू असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे.
चिखली -देऊळगाव राजा मार्गावरील वाहतूक बंद
काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्याआधीही सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाचे १९ दरवाजे १.५ मीटरने संध्याकाळी ६ वाजता उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात १०७७६९ क्युसेक इतका विसर्ग होत आहे. दुपारी तीनला १ मीटरने दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. कोणत्याही क्षणी चिखली -देऊळगाव राजा मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता होती. ती सायंकाळी खरी ठरली. हा रस्ता सायंकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय धरणाच्या सांडव्याखालून जाणारी गारखेड रस्त्यावरील वाहतूक दुपारपासून बंद करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील इतर लहान धरणे सावखेड भोई, पिंपळगाव चिलमखाँ, शिवनी आरमाळ, मेंढगाव ही लहान धरणेसुध्दा ओव्हरफ्लो झाली आहेत. तालुक्यातील सर्व नदी, ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन खडकपूर्णा प्रकल्प पूरनियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांनी बुलडाणा लाइव्हद्वारे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक धोक्यात आले आहेत. अनेक शेतांत पाणी साचल्यामुळे सोयाबीनचे मुळे सडत आहेत. उभ्या सोयाबीनच्या शेंगांना नव्याने कोंब फुटत असल्याने पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच सोयाबीनचे दर दिवसागणिक झपाट्याने खाली येत आहेत. विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडलेला आहे. देऊळगाव राजा तालुका हा सीड हब म्हणून ओळखला जातो. तालुक्यात विविध प्रकारचे नवनवीन बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या सक्रीय आहे . मिरची सिड्स, टोमॅटो या सिड्स बियाणे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सोयाबिन व मिरची या खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने तहसीलदार श्याम धनमने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर खान पठाण, संतोष हिवाळे, अमजत पठाण, चंद्रभान झिने हजर होते.
चिखली तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनी खरडल्या गेल्या
चिखली ः तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या तर काही ठिकाणी नगदी पिक असलेल्या उभ्या सोयाबीन व कापूस पिकांची नासाडी होऊन प्रचंड नुकसान झाले. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील पेठ, उत्रादा, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, वळती, शेलूद, बोरगाव काकडे या नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चिखली ते खामगावला जोडणारा पैनगंगा नदीवरील पेठ येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील वरखेड, पांढरदेव, भोरसा भोरसी, पाटोदा, पेनसावंगी यासह एकलारा व अमडापूर मंडळातील बऱ्याच ठिकाणी शेकडो हेक्टर शेत जमीनीतील शेतमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुंजाळा येथील शेतकरी सूर्यभान केदार यांनी बुलडाणा लाइव्हला कॉल करून शेतीच्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की शेतीच्या बाजूच्या नदीतील पाणी पात्र सोडून शेतात शिरले असून, यामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. खली-खामगाव रोडवरील उत्रादा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक रात्रीपासूनच बंद आहे. नदीकाठच्या साखळी, किन्होळा, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, उत्रादा, पेठ, चांधई या गावांना या पुराचा फटका बसला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस थांबला तर दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र पाऊस कोसळत राहिला तर वाहतूक बंद राहण्याची चिन्हे आहेत. चिखली तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अंचरवाडी भाग-१ व भाग २ येथील सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्याने अंचरवाडी -शेळगाव आटोळ वाहतूक रात्रीपासून बंद आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही, अंढेरा, बायगाव, मंडपगाव ,खल्याळ गव्हाण या भागात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पेनटाकळी प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडले!
पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाचे ९ पैकी ९ वक्र दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. प्रशासनाने पैनगंगा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन- तीन दिवसांपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे आणि काल सायंकाळपासून कोसळत असलेल्या अतिमुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. सोयाबीन, उडीद, मूग, ऊस, केळी व इतर पिकांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या नदीकाठची गावे पेनटाकळी, दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर, बारही, पाचला, भालेगाव, गौंढळा, कंबरखेड, नेमतापूर, फर्दापूर, सारंगपूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी, नांद्रा, गणपूरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेनटाकळी धरण ९० टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे पात्रात सोडल्यास पूर येऊ शकतो. संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवितहानी होवू नये म्हणून नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी गुरेढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवावे. सुरक्षितस्थळी सावध राहणे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पावसामुळे विद्युत तारा तुटल्याने ३० गावे अंधारात बुडाली होती. जानेफळसह परिसरातील गावकऱ्यांनाच अंधारातच त्रास काढावी लागली. विद्युत मंडळाचे सहायक अभियंता श्री. निकम, श्री. गीते, प्रवीण भाकडे, अमोल वानखेडे, अशोक शिरसाट, संदीप दहातोंडे आदी कर्मचाऱ्यांनी रात्री साडेअकरापासून पहाटे चारपर्यंत विद्युत वाहिनीत बिघाड बघितला. मात्र रात्री बिघाड सापडला नाही. आज सकाळी सहापासून बिघाड दुरुस्त करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. भरपावसात कर्मचारी कार्यरत होते.
नांदुरा- मोताळा वाहतूक ठप्प
नांदुरा तालुक्यात काल संध्याकाळपासून विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस सुरू आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विश्वगंगा नदीवरील पलढग धरण १०० टक्के भरले असून, शेंबा नदीवरील कच्चा पूल वाहून गेल्याने नांदुरा- मोताळा वाहतूक ठप्प झाली आहे. वडनेर भोलजीजवळ असलेल्या बुट्टी गावाला जाण्यासाठी विश्वगंगा नदी ओलांडून जावे लागते. याच नदीवर छोटा पूल असून, पुलावरून पाणी वाहत असून या गावाचा संपर्क पूर्णतः तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे.सकाळपासून पाऊस सुरूच असल्याने पूर अधिक वाढू शकतो. त्यामुळे कोणीही पुलावरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. नांदुरा शहरातील शांतीनगरमधील साबीर पठाण यांच्या घराजवळ असलेल्या झाडावर वीज पडून झाडावर बसलेल्या दोन माकडांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही. तालुक्यात सोयाबीन पीक काढणीला आले आहे. सोयाबीन व कापूस पिकांची जास्त प्रमाणात नासाडी झाली असून, कपाशीच्या कैऱ्या सडत असून, शेतकरी संकटात सापडला आहे. ज्ञानगंगा धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, गेरू माटरगाव येथील धरण १०० टक्के भरले आहे. या नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. याच नदीवर वळती वसाळी येथील गोडबोले बंधारा पूर्णपणे भरला असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याने नदी तुडूंब भरून वाहत आहे. मोताळा तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नळगंगा नदीला पूर आला आहे.
येळगावचे स्वयंचलित दरवाजे रात्रीच उघडले
येळगाव धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने रात्रीच धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. नदीपात्रातील पाणी १०० ते १५० मीटर नदीपत्राच्या बाहेर आल्याने नदीकाठच्या शेतांमधील पूर्णपणे नुकसान झाले आहे. पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. नांद्राकोळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रायपूर – बुलडाणा वाहतूक बंद आहे. पांग्री येथील रस्ता वाहून गेल्याने पांग्री- रायपूर रस्त्यावरील पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
लोणार तालुक्यातील अनेक गावांतील वाहतूक ठप्प
लोणार तालुक्यात सावरगाव मुंडे, हिरडव या गावातील नाले तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गावातील वाहतूक ठप्प झाली आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सोंगणीला आलेला सोयाबीन पूर्णतः झोपलेला आहे. काहींना कोंबही फुटले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे. आता सरकार काय उपाययोजना करेल याकडे त्यांचे लक्ष लागले. सावरगाव मुंढे आणि हिरडव येथील पाण्याच्या स्थितीची पाहणी करताना शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदू मापारी, शिवसेना शहराध्यक्ष पांडू सरकटे, ठाणेदार प्रदीप ठाकूर, चंद्रशेखर मुरडकर, गोपनीय शाखेचे श्री. चव्हाण आदींनी केली.
जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात २७-३० सप्टेंबर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यादरम्यान वीज कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. वीज चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी थांबावे. जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात उतरू नये. वाहने पशुधन, सुरक्षित ठिकाणी ठेवावे असा सावधानीचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यासोबतच क्षेत्रीय स्तरावरील सर्व जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
(वृत्तसंकलन ः संजय मोहिते, कृष्णा सपकाळ, राजेश कोल्हे, प्रवीण तायडे, अनिल मंजूळकर, प्रेम सिंगी)