ब्रेकिंग! कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यास लुटणारे पाचही पाेलीस कर्मचारी निलंबीत; जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची कारवाई; पाचही पाेलिसांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल..!
Aug 7, 2025, 20:50 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मलकापूरकडे जात असलेल्या कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यास पाेलिसांनीच लुटल्याची घटना चिखलीत घडली हाेती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचही पाेलीस कर्मचाऱ्यांना ७ ऑगस्ट राेजी तडकाफडकी निलंबीत केले आहे. तसेच पाचही पाेलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातील ताज अब्दुल रहेमान (वय २३) यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, बुलढाणा बायपास रोडवर ट्राफिक पोलिसांनी त्यांच्या वाहनाची अडवणूक करून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पेटीएमद्वारे १५०० रुपये घेतले. त्यानंतर इतर तीन पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या एअर रायफलवर कारवाई न करण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.या घडामोडींमुळे तक्रारदाराचे वाहन अनियंत्रित होऊन अपघात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा पाेलीस अधीक्षकांनी पो.हवा/1198 गजानन भंडारी – वाहतूक नियंत्रण शाखा, बुलढाणा, पोकॉ./2544 अभय टेकाळे – पो.स्टे. चिखली, पो.हवा./819 विठ्ठल काळुसे – महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर, पोकॉ./1069 संदीप किरके – महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर, पोका./306 विजय आंधळे – महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. तसेच पाचही पाेलीस कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश ७ ऑगस्ट राेजी जारी करण्यात आले आहे. तसेच निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात आले आहे.पुढील तपास चिखली पाेलीस करीत आहेत.