बोगस बियाणे प्रकरण तापले! शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; माजी आमदार संजय रायमुलकर यांची मागणी..!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप हंगामात बोगस बियाण्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि संबंधित बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून ती थेट शेतकऱ्यांना द्यावी, अशी ठाम मागणी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केली आहे. कृषी विभागानेही या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.मेहकर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत कृषी सेवा केंद्रांमधून विविध कंपन्यांची सोयाबीन व इतर पिकांची बियाणे खरेदी करून पेरणी करण्यात आली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी अपेक्षित उगवणच झाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून आर्थिक फटका अधिकच वाढला आहे.

 

 

यापूर्वीच बियाणे, खते आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी बियाणे कंपन्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.माजी आमदार संजय रायमुलकर यांनी कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारून पंचनामे करावेत आणि संबंधित कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून ती बाधित शेतकऱ्यांना द्यावी, अशी भूमिका मांडली आहे. तसेच, शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.