बुलढाण्यात मतदार याद्यांतील बोगस नोंदी पोहचल्या आदित्य ठाकरेपर्यंत; जयश्री शेळके यांनी उघड केला ‘मतचोरी’चा तपशील...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांतील मोठ्या विसंगतींवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जोरदार आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुबार नोंदी, मयत मतदारांची नावे, एकाच पत्त्यावर नोंदलेले अनेक मतदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेली ‘मतचोरी’ या तक्रारींचा सविस्तर अहवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर शुक्रवारी  १ नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आला.
या बैठकीत शिवसेना जिल्हा संघटक ॲड. जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा मतदारसंघातील स्थितीचा तपशीलवार आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “मतदार याद्यांतील विसंगतींमुळे लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, आणि त्यात फेरफार करण्याचा कुठलाही प्रयत्न म्हणजे लोकशाहीवर थेट आघात आहे.”

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन देऊन संपूर्ण मतदार यादीची चौकशी आणि पुनर्पडताळणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर जनआंदोलन उभारून हा मुद्दा तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रसंगी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“शिवसेना सदैव जनतेच्या न्यायासाठी उभी राहिली आहे. बुलढाणा मतदारसंघातील मतदारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.”

या मुद्द्यावरून आगामी जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी बुलढाण्यातील राजकारणात नवीन तापमान वाढण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांतील बोगस नोंदींचा मुद्दा स्थानिक प्रशासन आणि निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान ठरणार आहे.