BIG NEWS निवडणूक आयोगाचे ‘तारीख पे तारीख’ संपेना! एसआयआर प्रक्रिया पुन्हा लांबली! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक; अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनेक इच्छुकांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. मतदारसंघनिहाय बैठका, जनसंपर्क, गावभेटी, सामाजिक कार्यक्रम आणि राजकीय मोर्चेबांधणी सुरू असतानाच निवडणुका सातत्याने लांबत असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.आता अंतिम मतदार यादीच नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याने निवडणूक कार्यक्रमासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘निवडणूक कधी होणार?’ हा प्रश्न इच्छुकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे.
SIR प्रक्रिया नेमकी कशी होणार?
भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार—
- २४ ऑगस्ट २०२६ : मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण
- ३१ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती दाखल करण्याची मुदत
- ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ : दावे-हरकतींबाबत नोटीस व निपटारा
- ४ नोव्हेंबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गेल्या काही काळापासून राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. २० जिल्हा परिषदा,१२१ पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप प्रलंबित असल्याने ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणुकीची तारीख निश्चित होत नसल्याने अनेकांच्या राजकीय गणितांवर परिणाम होत आहे.
इच्छुक म्हणतात—‘आता तरी तारीख निश्चित करा!’
सतत बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा उत्साह कमी होत असल्याचे चित्र आहे. काहींनी पक्षांतर्गत उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर काहींनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क सुरू ठेवला आहे.मात्र निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, आरक्षणाचे अंतिम चित्र काय असेल आणि प्रत्यक्ष मतदान कधी होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात सध्या एकच चर्चा आहे—‘निवडणूक कधी?’
अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेला पुढील गती मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या नजरा आता ४ नोव्हेंबरच्या तारखेवर खिळल्या आहेत.