पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात १५ कोटींच्या आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन...
राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रुग्णालय परिसरात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. १५ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या आयुष रुग्णालयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार वाढविणे आणि नागरिकांना आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा लाभ मिळवून देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगजनांची तपासणी आणि साहित्य वाटप, महिलांसाठी स्तन व गर्भाशयासंदर्भातील आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, तसेच ‘टीबीमुक्त भारत’ अभियानांतर्गत रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात येणार आहे.याशिवाय स्त्री रुग्णालयातील रुग्णांशी संवाद, फळवाटप आणि वृक्षारोपण असे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सेवा उपक्रमातून आरोग्यसेवेचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड राहणार असून नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले आणि स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दरम्यान, भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने नागरिकांनी या कार्यक्रमाचा आणि विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत किडनी प्रत्यारोपणापासून बायपासपर्यंत उपचारांची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये मोफत किडनी प्रत्यारोपण, मणक्यांच्या शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया तसेच हिप व गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश आहे.या सुविधांचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधावा. तसेच 8830330754 आणि 9552105750 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.