२५ फेब्रुवारीपासून शेगावात आयुष आरोग्य महामेळावा; शेतकऱ्यांना औषधी शेतीचे मार्गदर्शन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांसाठी आयुर्वेदिक शेतीचा नवा मार्ग;

सहभागी होण्याचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन..!
 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संत नगरी शेगाव येथे २५ फेब्रुवारीपासून भव्य ‘आयुष आरोग्य महामेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून, या महामेळाव्यात शेतकऱ्यांसाठी वनशेती व औषधी वनस्पतींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे. आयुर्वेदिक शेती उत्पादन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

२५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान शेगाव येथील विसावा परिसरात आयुष मंत्रालयाच्या वतीने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, त्यानंतर दुपारी ३ वाजता शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती उत्पादन व विक्री मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या महामेळाव्यात विशेषतः वनऔषधी शेती, प्रक्रिया आणि विपणन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेतीची जोड मिळाल्यास त्यांचा आर्थिक फायदा होईल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मार्गदर्शन सत्रात नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) महेश कुमार दाधीच तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत नागार्जुन वनऔषधी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. नितीन पतके उपस्थित राहून शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी औषधी वनस्पतींच्या उत्पादनाकडे वळावे, जेणेकरून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल आणि जनतेलाही दर्जेदार नैसर्गिक उपचार उपलब्ध होतील, असा मानस प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.
केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत आयोजित या मेळाव्यात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सर्व विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारले जाणार आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि सर्वसामान्यांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा या महामेळाव्याचा दुहेरी उद्देश आहे. राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेसह मेळाव्याच्या नियोजनाची तयारी सुरू केली असून, २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान शेगावात आरोग्यजागर अनुभवता येणार आहे.