जिल्ह्यातील ८७५ जणांनी केली तब्बल तीन कोटींची वीजचोरी; महावितरणच्या सात महिन्यांच्या धडक मोहिमेत धक्कादायक उघड! मोठ्या व्यावसायिकांचाही समावेश; पोलिसांत गुन्हे दाखल..!
Aug 9, 2025, 13:27 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महावितरणकडून जानेवारी ते जुलै २०२५ या सात महिन्यांत राबविण्यात आलेल्या वीजचोरीविरोधी धडक मोहिमेत तब्बल तीन कोटी रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ व १२६ नुसार जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये ८७५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, यामध्ये काही मोठ्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. संबंधितांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात महावितरणचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी अशा मोठ्या संख्येने ग्राहक आहेत. तांत्रिक कारणांमुळे कधीकधी वीज गळती होणे वेगळे असले, तरी अलीकडच्या काळात छुप्या मार्गाने वीजचोरीचे प्रकार चिंताजनकरीत्या वाढले आहेत. शहरांमध्ये वेगाने वाढणाऱ्या अनधिकृत वसाहती व चाळ्यांमध्ये वीजचोरीचे प्रकार वारंवार उघड होत आहेत. वाढत्या वीजचोरीमुळे महावितरणला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर अप्रत्यक्ष आर्थिक भार पडत आहे.
महावितरण प्रशासन वीजचोरीविरोधात कटाक्षाने पावले उचलत असून, शहरातील वीजचोरी जास्त असलेली ठिकाणे ओळखण्यात आली आहेत. पुढील काळातही गोपनीय, सामूहिक आणि सातत्यपूर्ण मोहिमा राबवून आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या तांत्रिक सूत्रधारांवरही महावितरणचे लक्ष केंद्रीत आहे.