जिल्ह्यातील १० हजार ४३३ आजी-आजोबा रविवारी देणार साक्षरतेची परीक्षा; उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम; प्रत्येक शाळा राहणार परीक्षा केंद्र..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्र शासन पुरस्कृत "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" अंतर्गत असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी, दि. २१ सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीसाठी राज्यातील एकूण ८,८९,९९० नोंदणीकृत असाक्षर व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील १०,४३३ परीक्षार्थींचा समावेश असून त्यांनी रविवारी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण संचालक, पुणे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करणे तसेच आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, बालसंगोपन, कुटुंब कल्याण अशा महत्त्वाच्या जीवनकौशल्यांचा विकास करणे हा आहे.

चाचणीबाबत महत्त्वाची माहिती
वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००
कालावधी : ३ तास (दिव्यांग परीक्षार्थींना ६० मिनिटे अतिरिक्त वेळ)
माध्यम : मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली आदी भाषा
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप :
भाग क – वाचन : ५० गुण
भाग ख – लेखन : ५० गुण
भाग ग – संख्याज्ञान : ५० गुण
एकूण : १५० गुणप्रत्येक प्रत्येक भागात तसेच ३३% गुण मिळवणे अनिवार्य जास्तीत जास्त ५ ग्रेस गुणांची तरतूद

परीक्षा केंद्र व नियम
यू-डायस क्रमांकानुसार प्रत्येक शाळा हेच परीक्षा केंद्र असेल राहणार आहे. चाचणी फक्त उल्लास अॅपवर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींनाच देता येईल. चाचणीच्या दिवशी ऑनलाईन नोंदणी करूनही परीक्षा देता येईल. चाचणी ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल. परीक्षार्थींनी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर करावा. परीक्षेला जाताना ओळखपत्राचा पुरावा (मतदार ओळखपत्र / आधारकार्ड / पॅनकार्ड / बँक पासबुक इ.) सोबत बाळगावा. तसेच नोंदणी फॉर्मसाठी एक आयकार्ड साईज फोटो ठेवावा, मात्र फोटो देणे बंधनकारक नाही.

निकाल व प्रमाणपत्र
चाचणी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येईल. यामुळे असाक्षर व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा होऊन त्यांना स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता व उच्च कौशल्य विकसित करण्याच्या संधी उपलब्ध होतील.