तुमच्या दारात अचानक येत आहेत अधिकारी?; कारण समजलं नाही तर पुढे अडचणीत येऊ शकता! मतदारांनो काळजी घ्या....

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात सध्या अनेक नागरिकांच्या दारावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) भेट देताना दिसत आहेत. ही केवळ नियमित पाहणी नसून भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात वेग आला आहे. बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळत असून गणना प्रपत्र भरून घेत आहेत. पात्र मतदारांची नोंद अचूक राहावी आणि मतदार यादी अद्ययावत व्हावी, यासाठी प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक खातरजमा केली जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी विविध भागांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला देत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बीएलओ घरी आल्यास आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, गणना प्रपत्रातील माहिती तपासूनच सादर करावी आणि कोणतीही चुकीची माहिती देणे टाळावे. मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक असणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी सांगितले की, "मतदार यादी जितकी अचूक आणि अद्ययावत असेल, तितकी लोकशाही अधिक सक्षम होईल. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे."

दरम्यान, ज्यांना घरबसल्या माहिती सादर करायची आहे त्यांच्यासाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांना ईसीआयनेट (ECINET) ॲप किंवा [https://voters.eci.gov.in](https://voters.eci.gov.in) या संकेतस्थळाच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरता येणार आहे. तसेच आवश्यक मार्गदर्शनासाठी संबंधित बीएलओ किंवा मतदार नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.