संतापजनक! वरवंड "पीएचसी"चा खादाड मेडिकल ऑफिसर! मेडिकल बील अदा करण्यासाठी कर्मचाऱ्याला मागितले ३० हजार; म्हणे कारंजा चौकातल्या शिवकृपा मोबाईल शॉपीवर नेऊन दे, तेव्हाच करीन सह्या....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाखाच्या घरात पगार घेणारा मेडिकल ऑफिसर...मात्र शासनाचा पगार मिळत असला तरी त्याचे पोट काही भरत नाही..होय, ही गोष्ट आहे बुलढाणा तालुक्यातल्या वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसरची.. आरोग्य खात्यातीलच एक कनिष्ठ सहाय्यक दर्जाचा कर्मचारी कॅन्सरसारख्या  दुर्धर आजाराशी सामना करतोय.. उपचारासाठी आतापर्यंत जवळपास ५० लाख खर्च झालेत.. काही पैसे नातेवाईकांकडून घेतलेत, काही व्याजाने घेतलेत, काही पतसंस्थेतून कर्ज घेतले..आता उपचाराची बिले सादर केल्यानंतर या कनिष्ठ सहाय्यकांना शासनाकडून १४ लाख ८४ हजार रुपये मिळणार आहेत. ती रक्कम मेडिकल ऑफिसर च्या शासकीय  खात्यावर जमा देखील झाली आहे..मात्र मेडिकल ऑफिसर मात्र कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहाय्यकांना ही रक्कम अदा करायला तयार नाही..आधी ३० हजार द्या, मगच सह्या करतो असा अट्टाहास या खादाड मेडिकल ऑफिसर ने धरला आहे.. मृत्यूशी सामना करणाऱ्या आपल्याच  सहकाऱ्याला लुटतांना या मेडिकल ऑफिसरला थोडीशीही लाज वाटली नाही. स्वतः पीडित कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहायकांनी यासंबंधी "बुलडाणा लाइव्ह" ला ही माहिती दिली आहे..
कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहाय्यक हे २०१७ ते २०२५ या काळात वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. आता त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी झाली आहे. दरम्यान वरवंड येथे कार्यरत असताना त्यांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला. छत्रपती संभाजी नगरातील सिग्मा हॉस्पिटल, मुंबईतील अपोलो हॉस्पिटल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी त्यांनी उपचार घेतले. महागडे उपचार असल्याने  त्यासाठी पैशांची तडजोड करावी लागली. पतसंस्थेकडून कर्ज, नातेवाईकांकडून उसने पैसे, व्याजाने पैसे असे करून त्यांनी उपचार घेतले. अजूनही त्यांचे उपचार सुरू आहेत..दरम्यान शासनाकडे वैद्यकीय बिले सादर केल्यानंतर त्यांचे १४ लाख ८४ हजार रुपये बिल मंजूर झाले असून ते वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय खात्यात १८ दिवसांपासून जमा झाले आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पीडित कनिष्ठ सहायकांना रक्कम देण्यात आलेली नाही, उलट उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली. 

३०हजार दिल्यावर साहेब सह्या करतील..

दरम्यान आज,१८ डिसेंबरला पीडित कनिष्ठ सहायकांनी वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक सतीश तवर यांना फोन  करून मेडिकल बिला संदर्भात विचारणा केली. त्यावेळी  साहेबांचा (मेडिकल ऑफिसर चिंचोले) एक निरोप आहे , तुम्ही सोसायटी पेट्रोल पंपा जवळ या असे तवर यांनी सांगितले.त्यानंतर कॅन्सर ग्रस्त कनिष्ठ सहाय्यक सोसायटी पेट्रोल पंपाजवळ गेले असता "३० हजार रुपये कारंजा चौकातील शिवकृपा मोबाईल शॉपी वर ठेवा, तेव्हा साहेब वैद्यकीय बिलांवर सह्या करतील" असे तवर यांनी सांगितले. दरम्यान या प्रकारानंतर तवर यांनी पुन्हा दोन वेळेस व्हाट्सअप वर व्हॉइस कॉल करून कॅन्सर ग्रस्त कनिष्ठ सहाय्यकांना "साहेबांचा" निरोप सांगितला..

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले चौकशी करू..

दरम्यान घडल्या प्रकारासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले...