दाेन वर्षांपासून शिक्षकच मिळेनात, अमाेन्याच्या संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी भरवली सीईओंच्या दालनाबाहेरच शाळा! वारंवार निवेदने देवूनही प्रशासनाकडून दखल नाही; शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक आक्रमक..!
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच भाैतिक सुविधाही नसल्याने पटसंख्या घटत आहे. चिखली तालुक्यातील अमाेना येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या दाेन वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी पालकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिले. मात्र, शिक्षण विभागाने या निवेदनांची दखलच घेतली नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या अमाेना येथील पालकांनी विद्यार्थ्यांसह शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवली. पालकांच्या या आंदाेलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची तारांबळ उडाली. जाे पर्यंत शिक्षक मिळत नाहीत ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
श्वेता विलास कटके, विद्यार्थीनी, अमाेना
मी अमाेना येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. आम्हाला दाेन वर्षांपासून शिक्षकच मिळाले नाही. भाषा विषय शिकवण्यासाठी शिक्षक नाही. शिक्षक मिळावे यासाठी वेळाेवेळी शाळा समितीच्या अध्यक्षांनी निवेदन दिले. मात्र, शिक्षकच मिळत नाही. आता जाेपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही ताेपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. आमच्या पालकांवर कारवाई केली तरी उठणार नाही.
गजानन इंगळे, शाळा समिती अध्यक्ष, जि.प. शाळा अमाेना
गेल्या दाेन वर्षांपासून आमच्या विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नाही. शाळेवर दाेन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी वारंवार पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेकडे मागणी करण्यात आली. मात्र, आम्हाला शिक्षक मिळाले नाही. निवेदने दिल्यानंतर आम्हाला एक शिक्षक मिळाले त्यांचीही दुसरीकडे नियुक्ती करण्यात आली. आमच्या असाच अन्याय हाेत असेल हा अन्याय किती दिवस सहन करायचा. आता जाेपर्यंत दाेन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत नाही ताेपर्यंत आम्ही आंदाेलन सुरूच ठेवू. प्रशासनाला कुठली कारवाई करायची असेल तर करू शकता. पण आमच्या शाळेत शिक्षकांची नियुक्ती करा.