पेनटाकळीचे सर्वच गेट उघडले; नदीला पुर आल्याने पिकांचे नुकसान; येळगाव धरणातील विसर्ग आल्याने पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ..!
Sep 3, 2025, 14:30 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येळगाव धरणातून हाेत असलेल्या विसर्गामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली असून प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी साेडण्यात येत आहे. त्यामुळे, मेहकर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील पिकांना माेठा फटका बसला आहे.
मेहकर तालुक्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या पेनटाकळीत सध्या ८७ टक्के जलसाठा आहे. त्यातच बुलढाणा शहराजवळील येळगाव धरण ओव्हरफ्लाे झाले असून पाच गेट उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातील विसर्गामुळे पेनटाकळीच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली आहे.त्यामुळे, पेनटाकळी प्रकल्पाचे सर्वच गेट उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील पिके खरडून गेली आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सडली असून हातातोंडाशी आलेला घास गरीब शेतकऱ्यांचा गेल्यामुळे एक नवे संकट पुढे आले. आधीच साेयाबीन पिकावर हुमनी अळीने आक्रमण केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांवर नविन संकट आले आहे.