चिखली तालुक्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होणार! संतोष परिहार यांच्या खांद्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी...
Aug 25, 2025, 14:18 IST
चिखली : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंचरवाडी (ता. चिखली) येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संतोष दत्तात्रय परिहार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिखली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी २४ ऑगस्ट रोजी नियुक्ती पत्रक काढत ही घोषणा केली. संतोष परिहार हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेले असून ग्रामीण भागात पक्षाची भक्कम घडी बसविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली असून त्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना तालुकाध्यक्षपदी संधी दिली आहे.
आपल्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना परिहार म्हणाले, "माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने दिलेल्या विश्वासाची परतफेड करण्यासाठी मी चिखली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया अधिक भक्कम करेन. उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार आणि कार्य सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन." या नियुक्तीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, आमदार मनोज कायदे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे आणि जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांचे आभार मानत परिहार यांनी त्यांना श्रेय दिले आहे. परिहार यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
