ॲड. शर्वरी सावजी– तुपकरांनी मांडली "त्या" प्रकरणी माळेगावच्या गावकऱ्यांची बाजू! आरोपींना मिळाला जामीन....! गावकऱ्यांनी मानले ॲड. शर्वरी तुपकरांचे आभार....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वन विभागाच्या अख्यात्यारीतील अतिक्रमण  हटविण्याच्या  कारणावरून ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.  दरम्यान अटक असलेल्या  सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. शर्वरी तुपकर यांनी न्यायालयात केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळेच हा जामीन मंजूर झाला..

मोताळा तालुक्यातील माळेगाव शिवारात वन विभागाच्या वतीने अतिक्रमण  हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.  23 जुलै रोजी  वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच  पोलीस अधिकारी, कर्मचारी असा संपूर्ण ताफा  माळेगाव येथे अतिक्रमण हटविण्यासाठी गेला होता.  दरम्यान ग्रामस्थांनी अतिक्रमण टविण्यास विरोध केला. कारण या जमिनीवर गेल्या 30 वर्षापासून आदिवासी बांधव घरे करून राहत होते. जमिनीही कसत होते.  त्यामुळे हे जमीन आमच्या  हक्काची आहे असे म्हणणे  ग्रामस्थांचे होते तर ही जमीन वनविभागाची आहे असं वन विभागाचं म्हणणं  आहे.  दरम्यान  ग्रामस्थांनी अतिक्रमण जमिनीचे कायमस्वरूपी पत्ते मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केलेला होता या प्रकरणाच्या निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे म्हणणे ग्रामस्थांचे होते तर दुसरीकडे  वन विभागाने ही जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. 23  जुलै रोजी  वनविभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने घरे पाडून जमीन ताब्यात घेण्याच्या प्रयत्न करत असताना गावकरी व प्रशासनामध्ये जोरदार मारामारी झाली. संतप्त ग्रामस्थांनी  पोलीस आणि वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ला चढविल्याची घटना घडली होती  तर पोलिसांच्या मारहाणीत काही ग्रामस्थ जखमी झाले होते.  दरम्यान याप्रकरणी बोरखेडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत  पोलीस नाईक प्रवीण पडोळ यांच्या फिर्यादीवरून बोराखडी पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला होता.  अपराध क्रमांक
318/25  नुसार भादवी  कलम 109, 132, 118(1), 121, 121(2), 125, 324(4), 189(2), 191(2), 191(3), 190, 61(2),  कलम135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 1984  नुसार  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 24 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान बोराखेडी पोलिसांनी अटक सत्र राबवून विष्णू पुजाराम गायकवाड,  संजय तुळशिराम पिंपळे,नामदेव भीका गायकवाड,मंगल देवसिंग ठाकरे,प्रताप शिवाजी गायकवाड , रतन बबन बरडे,बळीराम भगवान मोरे, शेषराव रामा गायकवाड, अरुण आत्माराम वंजारी, अजय गणेश इरे, अर्जुन धोंडीराम फुलमाळी, शंकर तुकाराम पवार  यांना अटक केली होती. या सर्व आरोपींनी जामीन मिळण्यासाठी ऍड शर्वरी- सावजी तुपकर यांच्या माध्यमातून मलकापूर न्यायालयात अर्ज केला होता.  या आरोपींच्या जामीन प्रकरणाबाबत  आज 12  ऑगस्ट रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव, मलकापूर  यांच्या न्यायालयात सुनावणी  झाली असता  न्यायालयाने या सर्व  आरोपींचा जामीन मंजूर केला.  या आरोपींच्या वतीने  एडवोकेट शर्वरी सावजी- तुपकर यांचा  युक्तीवाद प्रभावी राहिल्याने या आरोपीना जामीन मिळाल्याची चर्चा आहे.