धावत्या ट्रकला लागली अचानक आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना!

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :राजा–जालना महामार्गावर जिजाऊ सृष्टीसमोर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या घटनेत ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या वेळेवर पोहोचलेल्या पथकामुळे मोठी दुर्घटना टळली.

मेहकर येथील व्यापारी योगेश काबरा यांच्या मालकीचा ट्रक (क्र. एम एच१५ FV २५२७) अहिल्यानगरकडे सोयाबीन घेऊन निघाला होता. चालक रवींद्र बनकर हे ट्रक घेऊन जात असताना जिजाऊ सृष्टीसमोर केबिनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. प्रसंगावधान राखत चालकाने तत्काळ सिंदखेड राजा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

ठाणेदार आशिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी सानप, पोहेका विकास राऊत व तांबेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या लहान अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले. मात्र, आग मोठ्या प्रमाणात असल्याने देऊळगाव राजा येथील मोठ्या अग्निशमन गाडीला देखील बोलावण्यात आले. दोन्ही दलांच्या संयुक्त प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आग विझवण्यासाठी फायरमन विजय नाथा जाधव, गंगाधर आसाराम हरकळ, तसेच वाहनचालक भगवान मापारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.