केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा येथे विशेष वैद्यकीय सेवा केंद्र; 'आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा' या भावनेतून भक्तांना आरोग्यसेवा..!
Jul 31, 2025, 15:57 IST
शेगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरहून शेगावच्या दिशेने निघालेल्या लाखो पादचारी भक्तगणांच्या आरोग्यसुविधेसाठी लासुरा फाटा येथे विशेष वैद्यकीय सेवा व मदत कक्ष उभारण्यात आला होता. ही संकल्पना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची असून, अधिवेशनात उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या वतीने ऋषी जाधव यांनी या सेवाकेंद्रात हजेरी लावून "आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा" या भावनेचा प्रत्यय दिला.
पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटपून तब्बल ६१ दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून आज ३१ जुलैच्या सकाळी शेगावकडे मार्गस्थ झाली. खामगाव ते शेगाव या मार्गावर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भक्त पायी वारी करत होते. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लासुरा फाटा येथे उभारण्यात आलेल्या या मदत कक्षात दोन रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सेस, सहाय्यक कर्मचारी आणि आवश्यक तेवढ्या औषधसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली होती.या केंद्रात उपस्थित राहून ऋषी जाधव यांनी वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले, त्यांना अभिवादन केले आणि गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हजारो भाविकांना तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यात आली. वारीत आरोग्यसेवेच्या माध्यमातून दिलेला हा उपक्रम भक्तांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून ‘सेवा हीच ईश्वर सेवा’ हे विधान या माध्यमातून साकार झाले आहे.