बुलडाणा जिल्ह्यात आढळल्या ८४ हजार ७५ "एकल" महिला! विधवांचे प्रमाण अधिक; जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांच्या पुढाकारातून झाले सर्वेक्षण; आता स्वावलंबनासाठी उचलणार पावले...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकल महिलांचे शहरी आणि ग्रामीण भागात सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात ८४ हजार ७५ एकल महिला आढळल्या आहेत. त्यात ग्रामीण भागात ७२७३९ तर नगरपालिका नागरी क्षेत्रात ११३३६ एकल महिला आहेत. या एकल महिलांमध्ये विधवा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. या एकल महिलांमध्ये ७२०१९ या विधवा महिला असून ३६२३ या परित्यक्ता व उर्वरित महिलांमध्ये घटस्फोटीत व जास्त वयाच्या अविवाहित महिला आहेत.
ग्रामीण भागात सर्वात जास्त एकल महिला बुलढाणा (८८९०), चिखली (८९४६) व मेहकर (८४६८) तालुक्यात अशी संख्या आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण फक्त ग्रामीण भागात झाले. परंतु, बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात हे सर्वेक्षण केल्यामुळे जिल्हास्तरावर संख्या उपलब्ध झाली असून एकल महिलांच्या प्रश्नावर नेमकी उपाययोजना करता येईल. राजमाता जिजाऊ यांचा बुलढाणा हा जिल्हा आहे. राजमाता जिजाऊ यांनी एकल महिला म्हणून जे कर्तृत्व दाखवले ते सर्वच एकल महिलांसाठी आत्मविश्वास व प्रेरणा देणारे असल्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या जिल्ह्यात एकल महिलांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम हा नक्कीच औचित्यपूर्ण ठरेल. ग्रामीण भागात व नागरी भागात उरलेल्या तालुक्यात अनुक्रमे देऊळगाव राजा (२७५५ व ६४३), जळगाव जामोद (४२४१ व २५९), खामगाव (६७६० व १६६५), लोणार (४४७६ व ३४१), मलकापूर (४७८६ व २२०४), मेहकर (८४६८ व १०८०), मोताळा (६३३७), नांदुरा (४७६७ व ६४७), संग्रामपूर (४००८ व २५७), शेगाव (२६६९ व १०३३), सिंदखेड राजा (५६३६ व ४९१), अशी ग्रामीण व नागरी संख्या आहे. या एकल महिलांचे वयानुसार वर्गीकरण करण्यात येणार असून या महिलांना गाव पातळीवर सर्व महत्त्वाचे दाखले आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या महिलांच्या १८ वर्षाखालील मुलांना बालसंगोपन योजना दिली जाईल.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले....

उमेदच्या माध्यमातून या एकल महिलांचे व्यवसाय सुरू केले जातील, त्यांच्या व्यवसाय प्रेरणा कार्यशाळा घेतल्या जातील आणि या महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येतील. त्यांचे वारसा हक्क त्यांना मिळवून देण्यात येतील, या माध्यमातून एकल महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्वाचे आहे.