कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले; १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान व्यापक सर्वेक्षण...
तपासणीदरम्यान जिल्ह्यात १४,००६ संशयित चट्ट्यांचे रुग्ण आढळून आले. या सर्व संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात आली. त्यातून ८३ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले असून, संबंधित रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. या निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना आजाराच्या प्रकारानुसार ६ महिने ते १ वर्षापर्यंत नियमित उपचार घ्यावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. हरी पवार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आढळलेल्या सर्व संशयित चट्ट्यांच्या रुग्णांची तपासणी १०० टक्के पूर्ण करण्यात आली असून, निदान झालेल्या सर्व ८३ नवीन कुष्ठरुग्णांना तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत, असेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या या व्यापक मोहिमेमुळे कुष्ठरोगाचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार सुरू होण्यास मदत झाली असून, रोगाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
