इसोली येथे विहिरीत पडून ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद...

मंगरुळ नवघरे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : इसोली येथे ७० वर्षीय वृद्धाचा शेतातील विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी  पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 
रामकिसन ज्ञानबा गवळी (रा. इसोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी समाधान गोविंद सुपेकर (वय ६८, रा. इसोली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल राजाराम येवले यांच्या मुंगी शिवारातील गट क्रमांक १४९ मधील शेतातील विहिरीत पडून गवळी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद दुपारी १.३५ वाजता पोलिसांत करण्यात आली.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार सहाय्यक फौजदार दिलीप तोंडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित वृद्धाचा मृत्यू अपघाती आहे की अन्य कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून सर्व शक्यतांचा तपास करण्यात येत आहे. अधिक माहिती तपासाअंती समोर येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.