बुलढाणा जिल्ह्यातील ५१ हजार 'लाडक्या बहिणी'चा लाभ हाेल्डवर; ६५ वर्षांवरील आणि एकाच कुटुंबातील तिसरा लाभार्थी असल्याने थांबवण्यात आला लाभ..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर  करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी  बहीण याेजनेची आता काटेकाेरपणे पडताळणी करण्यात येत आहे. या याेजनेसाठी २१ ते ६५ वर्षाखालील महिला तसेच एकाच कुटुंबातील केवळ दाेन महिलांना लाभ मिळेल अशी अट आहे.या योजनेच्या अंमलबजावणीत कुटुंब व्याख्येतील विसंगतीमुळे जिल्ह्यातील ५१,४३० लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. यामध्ये ६५ वर्षांवरील १२,१३३ महिला आणि एका कुटुंबातील २ पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या ३९,२६७ महिलांचा समावेश आहे.
या योजनेच्या लाभार्थी पडताळणीसाठी लाडकी बहीण योजनेतील शासन निर्णयातील कुटुंब व्याख्या आणि पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकेतील व्याख्या यामधील फरकामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुरवठा विभागाच्या माहितीच्या आधारावर लाभ मंजूर झाले आहेत. परिणामी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार असलेल्या कुटुंबाच्या व्याख्येच्या आधारावर नव्याने पडताळणी केली जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेतील कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी व अविवाहित मुले अशी स्पष्ट आहे. मात्र, शिधापत्रिकेतील व्याख्या वेगळी असल्याने अनेक ठिकाणी लाभ देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी आता नव्याने पडताळणी करण्यात येत असून, लाभ थांबवले गेलेले अर्ज रद्द करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यातील २१७ महिलांनी स्वत:हून या याेजनेचा लाभ साेडला आहे. तसेच  पडताळणीमध्ये जिल्ह्यातील २४ हजार ८२८ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.