जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रभाग रचनेवर जिल्हाभरातून ४९ हरकती; विभागीय आयुक्तांकडे ३१ जुलै पर्यंत हाेणार सुनावणी; अंतिम रचनेकडे लागले इच्छुकांचे लक्ष..!
Jul 29, 2025, 14:10 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या ६१ गट आणि १३ पंचायत समित्यांच्या १२२ गणांची प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली हाेती. या प्रारुप रचनेवर नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या हाेत्या. जिल्हाभरातून ४९ हरकती प्राप्त झाल्या असून त्यावर आता सुनावणी सुरू झाली आहे. ३१ जुलैपर्यंत ही सुनावणी पूर्ण हाेणार असून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अनेक गट कायम असले तरी गावांची अदलाबदल झाल्याने अनेकांचे गणिते बिघडणार आहेत. त्यामुळे, आपल्या साेयीचे नसलेल्या गावांसाठी हरकती सादर करण्यात आल्या आहेत. त्यावर काय निर्णय हाेताे हे येत्या दाेन दिवसात स्पष्ट हाेणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची दाेन ते तीन वर्षांपासून इच्छुक प्रतिक्षा करीत आहेत. अखेर जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग माेकळा झाला आहे. प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या ६१ गट आणि १२२ गणांची प्रारुप रचना प्रसिद्ध केली. ही प्रारूप रचना तहसील स्तरावर लावून २१ जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानंतर २२ ते २६ जुलैदरम्यान काही हरकतींचा विचार करून आंशिक बदलही करण्यात आले. आता संपूर्ण प्रस्ताव सोमवारी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे, जिथे त्यावरील सुनावणी पार पडणार आहे.त्यानंतर प्रभाग रचना अंतिम हाेणार आहे. या प्रभाग रचनेकडे आता इच्छुकांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. राजकारण तापणार जिल्ह्यात दाेन ते अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नियुक्त आहेत. आता निवडणुका हाेणार असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच स्थानिक नेत्यांसाठी ही माेठी संधी असल्याने गावागावातील राजकारण आता तापणार आहे.