मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशनच्या धान्यापासून वंचित! मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिनीही लाभ नाही; पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थी त्रस्त...
मेहकर तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी दोन गोडाऊन आहेत. मेहकर येथील गोडाऊनवरून १३६ रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा केला जातो, तर डोणगाव येथील गोडाऊनवरून ३८ रेशन दुकानदारांना धान्य वितरित होते. नियमानुसार महिन्याच्या सुरुवातीलाच रेशनचा पुरवठा होणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे.
डोणगाव गोडाऊनअंतर्गत असलेल्या ३८ पैकी केवळ १३ दुकानदारांना २४ जानेवारी रोजी धान्य मिळाले, तर उर्वरित २५ दुकानदारांना अद्याप ज्वारीचा पुरवठा झालेला नाही. यामुळे संबंधित गावांतील नागरिक रेशनपासून पूर्णतः वंचित राहिले आहेत.
‘पॉस मशीन’ बंद; वाटप ठप्प
पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ दुकानदारांना ३१ डिसेंबर २०२६ रोजी ज्वारी प्राप्त झाली होती. मात्र रेशन वाटपासाठी आवश्यक असलेल्या पॉस (POS) मशीन बंद असल्याने वाटपच होऊ शकले नाही.
“पॉस मशीनमध्ये वाटपाचा डेटा उपलब्ध झाल्यानंतरच रेशन वाटप सुरू होईल,” अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत गरीब नागरिकांनी उपासमारीचा सामना करायचा का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
खाण्यायोग्य नसलेली ज्वारी
२४ जानेवारी रोजी ज्या १३ दुकानदारांना ज्वारी मिळाली, ती धान्यसुद्धा खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. यामुळे केवळ पुरवठ्यातील विलंबच नव्हे, तर धान्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेपाची मागणी
या संपूर्ण प्रकारामुळे मेहकर तालुक्यातील पुरवठा व्यवस्थेवर विश्वास उरलेला नसून, जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून स्वतंत्र व जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
वेळेवर आणि दर्जेदार रेशन धान्य पुरवठा होण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही लाभार्थ्यांकडून दिला जात आहे.