बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. सन २०२४ च्या खरीप हंगामातील तब्बल २ लाख ४४ हजार २६२ शेतकरी अद्याप पिक विम्यापासून वंचित आहेत. तसेच हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मेहकर व लोणार तालुक्यातील ढगफुटीमुळे झालेल्या जमीन व पिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. जी मिळाली आहे, ती अत्यल्प आहे.शेतकरी प्रचंड संकटात सापडला असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही. “पिक विमा आणि नुकसानभरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का?” असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तुपकर यांनी मागणी केली की, पिक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याचा लाभ द्यावा. तसेच हुमणी अळी, शेंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी. या संदर्भातले निवेदन त्यांनी १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सादर केले.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शिष्टमंडळासह १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी तुपकर म्हणाले, “काल (१३ ऑगस्ट) बुलढाणा जिल्ह्यातील ६ हजार ६०७ शेतकऱ्यांना १४ कोटींचा पिक विमा मिळाला. पण त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम मिळाली. ही तोकडी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे.”त्यातच खरीप २०२४ हंगामातील २ लाख ४४ हजार २६२ शेतकरी अजूनही पिक विम्यापासून वंचित आहेत. अनेक ठिकाणी नुकसान होऊनही शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट झाले आहेत. एकाच गट नंबर किंवा सर्व्हे नंबरमध्ये शेजारील शेतकऱ्यांचे समान नुकसान असूनही नुकसानभरपाई एका शेतकऱ्यालाच मंजूर केली जाते. शेजारच्याचा दावा अपात्र ठरतो. “हा विमा कंपन्यांचा दुटप्पीपणा असून कृषी विभागदेखील या अजब कारभारात सहभागी आहे. त्यामुळे पिक विमा कंपन्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे,” असे तुपकर म्हणाले.
यासाठी त्यांनी २०१४ ते २०२४ या कालावधीत राज्यभर काम करणाऱ्या कृषी विमा कंपन्यांचे टेस्ट ऑडिट करण्याची मागणी केली. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पिक विम्यापासून वंचित अडीच लाख शेतकऱ्यांना दुजाभाव न करता १०० टक्के विमा भरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्तांना मदत द्या; पोटखराब शेतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
दोन वेळा झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, चिखली तालुक्यातील शेकडो गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरातील साहित्य, अन्नधान्य, शेतीपिके, विहिरी, पाईपलाईन, तुषारसंच यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे तातडीचे आहे.२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही शेतीची पोटखराब म्हणून नोंद झाली आहे. यासाठी सरकारकडून एकरी १८,८०० रुपये मदत जाहीर झाली आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ‘पडीक’ जमीन म्हणून नोंद होणार आहे. पुढील हंगामात त्या जमिनीत पीकपेरा दाखवता येणार नाही; बँकेकडून कर्ज मिळणार नाही. जमीन पुन्हा वहीती करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागेल. ही प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत किचकट असून शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात.“ही प्रक्रिया सुलभ करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या,” अशी मागणी तुपकर यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.