१९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या!
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नीट परीक्षेत चांगले गुण मिळण्याच्या चिंतेतून १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल, २० ऑक्टोबर रोजी लोणार शहरातील खडकेश्वरनगर भागात ही घटना घडली.
रोशनी नारायण कायंदे (१९, रा. खडकेश्वरनगर, लोणार) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिला डॉक्टर व्हायचे होते. सप्टेंबरमध्ये तिने "नीट'ची परीक्षा दिली होती. मात्र परीक्षेत अपेक्षित गुण मिळतील की नाही, याची धास्ती तिला होती. त्यामुळे ती तणावाखाली होती. काल दुपारी तीनच्या सुमारास घरी कुणी नसताना पंख्याला साडीच्या सहाय्याने तिने गळफास घेतला. कुटूंबियांना घटनेबद्दल कळताच त्यांनी हंबरडा फोडला.
लोणार पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. लोणार पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास लोणार पोलीस ठाण्याचे पोहेकाँ राम गीते करीत आहेत.