मोताळा तालुक्यात अपहरणाच्या दोन घटना; अल्पवयीन मुलीला पळवले ; १३ वर्षीय मुलाच्याही अपहरणाची तक्रार
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एकाच दिवसात मोताळा तालुक्यात अपहरणाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. रिधोरा जहाँगीर येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले तर दुसऱ्या घटनेत १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना सांगळद येथे घडली. बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
रिधोरा जहाँगीर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी २४ ऑगस्टच्या रात्री लघुशंकेसाठी उठली होती. यावेळी तिच्या भावाला सुद्धा जाग आली. मात्र लघुशंकेसाठी गेलेली त्याची बहीण घरात परतलीच नाही. ही बाब त्याने वडिलांना झोपेतून उठवून सांगितली. सर्वांनी शोधाशोध करूनही ती मिळून आली नाही. सकाळीच मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोताळा येथील अंकुश पुंजाजी वाघ याने आपल्या मुलीचे अपहरण केले, असा संशय व्यक्त केला आहे. अंकुशविरुद्ध तक्रार दिली. बोराखेडी पोलिसांनी अंकुशविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत सांगळद येथीलअर्जुन रामेश्वर पवार (१३) हा मुलगा खेळायला बाहेर जातो असे सांगून काल सकाळी घराबाहेर पडला. मात्र रात्र होऊनही तो घरी परतला नाही. शोध घेऊनही मिळून आला नाही. बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.