मुलीला पळवून नेऊन लग्न केले!, पण पुढे काय झालं वाचा…; खामगाव शहरातील घटना
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही दिवसांपूर्वी मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या कारणावरून वाद होऊन दोन कुटुंबात राडा झाला. यात दोघे जखमी झाले आहेत. ही घटना काल, २४ ऑगस्ट रोजी खामगाव शहरातील आठवडे बाजारात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोघांविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष रंगनाथ पवार (रा. अंत्रज, ता. खामगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या साल्याने काही दिवसांपूर्वी रोहणा (ता. खामगाव) येथील सितार काश्मीर पवार यांच्या बहिणीला पळवून नेले होते. या कारणावरून सितारने आठवडे बाजारात आलेल्या संतोष पवार याच्याशी वाद घातला. हा वाद वाढत जाऊन सितारने संतोषच्या डोक्यात काठीने वार केले.
याच घटनेप्रकरणी पोलिसांत दुसऱ्या कुटुंबानेही तक्रार दिली असून, काशमीर लाभा पवार (रा. रोहणा, ता. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला संतोष पवार यांच्या साल्याने पळवून नेऊन लग्न केले आहे. त्यामुळे त्यांचे आपसात पटत नाही. याचा राग आल्याने संतोष पवारने काशमीर पवार यांना डोक्यात काठीने मारहाण केली व जखमी केले. परस्परविरोधी तक्रारीवरून सितार काशमीर पवार(१९, रा. रोहणा, खामगाव) व संतोष रंगनाथ पवार (रा. अंत्रज, खामगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.