Spot Report : काम बंद असल्याचे ऐकले अन् टिप्पर परत फिरले…पण काळाचा सांगावा १३ मजुरांना कळलाच नाही!; चिमुकल्या छब्बूला देवाने अक्षरशः तारले!!
सिंदखेड राजा (कृष्णा सपकाळ/बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसामुळे काम बंद असल्याचा निराेप मिळाला अन् टिप्परसह १५ परप्रांतीय मजूर तात्पुरत्या निवासस्थानांकडे परत फिरले… मात्र हा जणू काळाचाच सांगावा असावा… विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला वाचवताना टिप्पर रस्त्याच्या कडेला येत उलटले. यात १३ मजूर जागीच झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकासोबत केबिनमध्ये बसलेली १२ वर्षीय मुलगीही सुरक्षित राहिली. अपघात होताच चालक पसार झाला. ही घटना तढेगाव फाट्यापासून अर्ध्या किलोमीटरवर देऊळगाव मही (ता. सिंदखेड राजा) रोडवर आज, २० ऑगस्टला दुपारी १२ च्या सुमारास घडली.
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या कामावरील मजुरांसाठी तढेगाव (ता. सिंदखेड राजा) येथे येथे समृद्धी बेस कॅम्प आहे. या कॅम्पवर जवळपास ३०० हून अधिक मजूर कुटुंबासह राहतात. हे मजूर बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांतील आहेत. सकाळी दहाच्या सुमारास टिप्पर (क्र. एमएच ११ एएल ३७२०) १५ मजूर घेऊन त्यात लोखंडी सळई व सिमेंट घेऊन समृद्धी महामार्गाच्या कामावर गेले होते. परंतु पाऊस आल्यामुळे काम बंद असल्याचे कळाले आणि मजूर दुपारी १२ च्या सुमारास कामावरून परत कॅम्पवर याच टिप्परने सोबत आणलेले जेवणाचे डबे घेऊन तसेच परत फिरले. राहेरी पूल बंद असल्याने वाहतूक तढेगाव- देऊळगाव मही या मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र हा रस्ता एकतर्फा आहे. त्यातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजूचा भाग निसरडा झाला आहे.
तडेगाव फाट्यापासून अर्ध्या किलोमीटरवर विरुद्ध दिशेने एसटी बस आल्याने तिला रस्ता देण्याच्या नादात टिप्पर रस्त्याखाली आले आणि पावसामुळे निरसडा झालेल्या रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. अपघात एवढा भीषण होता की १२ वर्षीय छब्बू नावाची केबिनमध्ये बसलेली मुलगी आणि टिप्परमध्ये मागे बसलेले दोघे बाहेर फेकले गेले. मात्र मागेच बसलेले अन्य १३ मजूर सळयाखाली दबले. सर्व मजुरांना जालना येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यातील १३ जणांचा पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एका मजुराला जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चिमुकली छब्बूला साधे खरचटलेही नाही. मात्र तिने या अपघातात पितृछत्र गमावले आहे. मृतकांत तिचे वडीलही आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सोमनाथ पवार, जमादार अशोक चाटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मजुरांना रुग्णालयात हलवले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली असून, कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
मृतकांची नावे…
गणेश डावर (20, रा. मेलखेडी जि.खरगोण)
गोविंद शिलोड (25, रा. भोंडल जि. धार)
नारायण डावर (25, मेलखेडी जि. खरगोण)
करण मकवणे (19, काकलपूर जि.धार)
दीपक डावर (21, मेलखेडी जि.खरगोण)
सुनील डावर (22, मेलखेडी जि.खरगोण)
दिनेश गावड (२७, हनुमत्या जि.धार)
जितेन मकवणे (19, मकशी जि.खरगोण)
दिलीप कटारे (25, अंबापूर जि.धार)
मिथुन माचारे (19, तारापूर जि.धार)
लक्ष्मण डावर (20, मोहिदा जि. खरगोण)
महेश कटारे (31, बाबलाई जि.खरगोण)
देवराम ओसरे (21, कचिकुवा जि.खरगोण)
मृतक सर्व मजूर मध्यप्रदेशातील आहेत.