भरधाव दुचाकीवरून पडल्याने युवकाचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकीवरून पडल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काल, १९ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास मोताळा -बुलडाणा रोडवरील बोराखेडी फाट्याजवळ घडली. श्रीपाल देविदास दाभाडे (३३, रा. मोताळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आन्वा (ता. भोकरदन) येथील शिवाजी मास्कर याच्या विनानंबरच्या मोटारसायकल बसून श्रीपाल बुलडाण्याकडे येत होता. बोराखेडी फाट्याजवळ मास्कर याच्या ताब्यातील मोटारसायकलीने समोरील अभिजित राणे यांच्या मोटारसायकलीला मागून धडक दिली. यामुळे मास्कर यांच्या मागे बसलेला श्रीपाल गाडीवरून रोडवर आदळला. श्रीपालला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. श्रीपाल यांच्या चुलतभावाने दिलेल्या तक्रारीवरून निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या शिवाजी मास्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.