बिग ब्रेकिंग! ७ ऑक्टोबरपासून उघडणार जिल्ह्यातील “देवाची दारे’!! ६५ वर्षांवरील अन् १० वर्षांखालील व्यक्तींना मनाई; भाविकांमध्ये ६ फुटांचे अंतर, त्रिसूत्रीसह अनेक अटींचे निर्देश
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे दीर्घकाळ बंद असलेली जिल्ह्यातील मंदिरे आणि सर्वच धार्मिक स्थळांची दारे, महाद्वारे आता लवकरच उघडणार आहेत. होय, येत्या ७ ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्र भाविकांसाठी खुली होणार आहेत. मात्र यामुळे सर्वांनीच हुरळून जायचं काम नाही. याचे कारण १० वर्षांखालील बालके अन् ६५ वर्षांवरील वृद्ध भाविकांसाठी दर्शनबंदी कायमच राहणार आहे! उर्वरित भाविकांनाही अनेक अटी- शर्तींच्या अडथळ्यांचा सामना करूनच लाडक्या दैवताचे याची देही, याची डोळा दर्शन होणार आहे…
कोरोनाचा प्रकोपरूपी कहर अन् लहर यामुळे जिल्ह्यातील हजारो धार्मिक स्थळे अनेक महिन्यांपासून कुलूपबंद आहेत. मागील पंधरवड्यापासून कोरोना आटोक्यात आल्याने अखेर राज्य शासनाने देवाची दारे उघडण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने इंग्रजी भाषेतील सहा पानी मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहे. सर्वंकष चिंतन मनन करून हे मार्गदर्शन करण्यात आले असले तरी स्थानिक परिस्थितीनुसार यात जिल्हाधिकारी काही बदल करू शकतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहेत निकष…
दरम्यान, ७ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात येतील. मात्र कंटेन्मेंट झोनमधील स्थळांना मनाई राहणार असून, १० वर्षांवरील व ६५ वर्षांखालील भविकांनाच दर्शन घेता येईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असून, रांगेतील भाविकांत सहा फुटांचे अंतर आवश्यक आहे. यासाठी संस्थान, ट्रस्ट, बोर्ड, व्यवस्थापक मंडळांना रांगेत मार्किंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवेशद्वारी तापमान मोजण्याकरिता थर्मल गन, दक्षता दर्शक बोर्ड लावणे बंधनकारक राहणार आहे. भाविकांना गटागटाने सोडावे लागणार असून, स्थळाचा आकार लक्षात घेऊन तशी व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच भाविकांना येण्या व जाण्याकरिता स्वतंत्र मार्ग ठेवावे लागणार आहे. भाविकांनी आपली पात्रदाने स्वतःच्या गाडीत ठेवावी.
तसेच ती ठेवण्याची जागा, संडास बाथरूम नियमित सॅनिटाइज करणे, फरश्या नियमित अंतराने साफ व निर्जंतुक करावी करावी, एसीद्वारे २४ ते ३० सेल्सियस इतके तापमान आणि ४० ते ७० दरम्यान आद्रता ठेवावी लागणार आहे. व्यवस्थापनाने धार्मिक गीते, भजन लावण्यास मंजुरी असली तरी भाविकांना सामूहिकपणे गीते वा मंत्र म्हणण्यास सक्त मनाई राहणार आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या स्वयंसेवक वा सेवेकऱ्यांनी कोरोनाविषयक निर्देशाचे कडक पालन करणे व आठवड्यातून एकदा कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. आजारी व्यक्तींना प्रवेश नाकारावा आणि त्यांना एका रूममध्ये बसवून त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालय वा आरोग्य केंद्रास द्यावी लागणार आहे.