“ती’च्या वाचून सध्या सर्वांचेच हाल…. मनसैनिक तिच्या “साहेबां’ना भेटले!
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या ती गावात येत नाही अशी खामगाव तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन थेट “तिच्या’ साहेबांचे कार्यालय गाठले आणि तातडीने तिला गावांत पाठवा, अशी गळ घातली. आता सर्व काही साहेबांच्या हाती आहे…
ती नक्की आहे कोण, जिच्यावाचून इतक्या लोकांचे हाल होत आहेत, असा प्रश्न वाचकांना पडणे साहाजिक आहे. पण ती दुसरी तिसरी कुणी नसून, सर्वांची “लाडकी’ लालपरी आहे… खामगाव तालुक्यातील बसफेऱ्या कोरोनामुळे बंद केल्या होत्या. त्या अद्याप बंदच आहेत. हा प्रश्न मनसैनिकांनी ऐरणीवर घेतला आहे.
यासंदर्भात त्यांनी खामगाव आगाराच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की सध्या महाविद्यालय, शिकवणी वर्ग सुरू झाले आहेत. ४ ऑक्टोबरपासून शाळाही सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकऱ्यांचे बसवाचून गैरसोय होत आहे. त्यांना शहरात येण्याजाण्यास अडचण येत आहे. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू कराव्यात. ४ ऑक्टोबरपर्यंत बसफेरी सुरू न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल. त्याच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आगारप्रमुखांची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवशंकर लगर यांची सही आहे.