घाईत एटीएममध्ये विसरलेले कार्ड भामट्याच्या हाती लागले!; शिक्षकाला ४५ हजारांचा फटका!; सिंदखेड राजातील घटना
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाकडून घाईत एटीएममध्येच विसरलेले कार्ड भामट्याच्या हाती लागले. त्याने या कार्डद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी ५० हजार रुपये काढले. शिक्षकाने या प्रकरणाची तक्रार सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत संपतराव चौधरी (ह. मु. किनगाव राजा, ता. सिंदखेड राजा, मूळगाव टाकळी ता. आष्टी जि. बीड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यांच्या मुलीला त्यांनी सिंदखेड राजा येथील डिघोळे हाॅस्पिटलमध्ये ३० सप्टेंबरला उपचारासाठी आणले होते. उपचारासाठी पैशाची गरज असल्याने ते पत्नीचे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड घेऊन महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये गेले. मेहेत्रे हाॅस्पिटलजवळील या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता निघाले नाहीत. मात्र घाईत त्यांचे एटीएम कार्ड तिथेच राहून गेले. त्यानंतर ते घरी परतले.
त्यांच्या पत्नीचे मोबाइलवर साडेदहाच्या सुमारास दोनवेळा २० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर पावणेअकराच्या सुमारास संत गजानन महाराज पेट्रोलपंप माळसावरगाव येथे ५ हजार रुपयांचे डिझेल भरल्याचा मेसेज आला. नंतर सव्वा बाराच्या सुमारास जालना येथील एचडीएफसीच्या एटीएममधून ९०० रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यामुळे शिक्षक चौधरी यांनी एटीएम कार्ड तपासले असता ते मिळून आले नाही. घाईत सिंदखेड राजात एटीएमवर कार्ड विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिथे येऊन पाहिले असता दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी भामट्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ श्री. डोंगरदिवे करत आहेत.