करणी सेनेने गाठले Buldana Live कार्यालय!; म्हणाले, विजयसिंह पाटील यांच्या कुटुंबावर दबाव आणला जातोय!!, “रूखाई’च्या सचिवांवर कठोर कारवाईची मागणी, आरोपींना अद्याप अटक नसल्याने “एसपीं’चीही भेट घेतली
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातगाव म्हसला (ता. बुलडाणा) येथील विजयसिंह पाटील यांच्या अन्नत्यागानंतरच्या आत्महत्येला जबाबदार धरून दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे धाड पोलिसांनी बुलडाणा येथील श्री गणेशा शिक्षण संस्था संचालित रुखाई माध्यमिक कन्या विद्यालयाच्या सचिवासह कोषाध्यक्षा, मुख्याध्यापिका, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत करणी सेनेने या वादात उडी घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच विजयसिंह पाटलांच्या मुलाला संस्थेत नोकरी द्यावी व मोबदला द्यावा, अशी मागणी काल, ५ ऑगस्टला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यानंतर आज, ६ ऑगस्टला करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुलडाणा लाइव्ह कार्यालय गाठले आणि भूमिका मांडली.
श्री राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. नंदाताई राजपूत यांनी विजयसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. नंतर त्या पदाधिकाऱ्यांसह बुलडाणा लाइव्ह कार्यालयात आल्या. संस्थेचे सचिव दीपक पाटील व व्यवस्थापन विजयसिंह पाटील यांच्या कुटुंबावर दबाव आणत आहे. मात्र आम्ही दबाव सहन करणार नाहीत. जशास तसे उत्तर देऊ. पाटील कुटुंबाच्या पाठिशी करणी सेना असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत तक्रारकर्ते व विजयसिंह पाटील यांचे मावसभाऊ डाॅ. उत्तम राजपूत हेही होते.
करणी सेना आणि तक्रारकर्त्यांचे आरोप…
- सचिव दीपक पाटील यांनी विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची बातमी देशोन्नतीत छापून आली होती. ती बातमी शिपाई विजयसिंह पाटील यांनीच बातमीदाराला पुरवल्याचा संशय घेऊन दीपक पाटील यांनी त्यांचा छळ मांडला.हजेरी मस्टरवर सही न करू देणे, पगार न काढणे, कामावर येऊ न देणे या प्रकारचा त्रास दिला.
- पैशांअभावी विजयसिंह यांची पत्नी इंदूमती पाटील यांचे निधन झाले.
- विजयसिंह यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांच्यावर एकतर्फी कार्यवाही करून नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले.
- त्यांचा पेन्शनचा प्रस्ताव सादर न करणे, त्यांना ग्रॅच्युटी न देेणे, रजा रोखीकरण न देणे अशा प्रकारे त्रास कायम राहिला.
- त्रासाला कंटाळून विजयसिंह यांनी गेल्या वर्षी ऑगस्टपासून घरी सातगाव म्हसला येथे अन्नत्याग सुरू केला होता.
- अखेर ३० जुलै २०२१ रोजी रात्री साडेअकराला त्यांची प्राणज्योत मालवली.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
सचिव दीपक त्र्यंबक पाटील, ५८, रा. रूखाई कन्या विद्यालय, बुलडाणा, कोषाध्यक्षा आरती त्र्यंबकराव पाटील (५१ रा. रूखाई कन्या विद्यालय, बुलडाणा), मुख्याध्यापक वर्षा राजधरसिंह राजपूत (५२ मुख्याध्यापक, रा. महावितरण कार्यालयामागे, अष्टविनायकनगर, बुलडाणा), लिपिक दिनेश धोंडू फासे (४५, रा. अष्टविनायकनगर बुलडाणा) यांच्याविरुद्ध धाड पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.