अचानक वळलेल्या बसवर कार धडकली, कारमधील चौघे जखमी; चिखली तालुक्यातील दुर्घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाने अचानक बस वळवल्याने कार येऊन धडकली. यात कारमधील चौघे जखमी झाले. ही घटना चिखली- रोडवरील भानखेड शिवारातील हॉटेल छत्रपतीसमोर काल, २ ऑक्टोबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
रामेश्वर डिगांबर डोके (३१, रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) यांनी या प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डोके हे वडील, पत्नी, मुलासह मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच ४० पी ५५७०) चिखली-जालना रोडने रोहणाकडे येत होते. त्यांच्या गाडीसमोर बस (क्रमांक एमएच १४ बीटी २८९७) चालली होती. कार डिव्हायडरला लागून असताना अचानक बसचालकाने कोणतेही इंडिकेटर न देता व हात न दाखवता त्याच्या ताब्यातील बस एकदम वळवून रोडच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या छत्रपती ढाब्याकडे जाण्यासाठी टाकली. त्यामुळे कार बसवर धडकली.
कारचे एकदम ब्रेक दाबल्याने सुदैवाने डोके कुटुंब वाचले. मात्र डोके यांच्यासह त्यांचे वडील जखमी झाले. त्यांच्या पत्नीच्या दंडाला व मुलाच्या डोक्याला, नाकाला, हाताला मार लागून तेही जखमी झाले आहेत. कारचेही मोठे नुकसान झाले आहे. बोनेट, समोरील काच, रेडिएटर, इंजिन, दोन्ही बाजूचे समोरील दरवाजे यांची तुटफूट होऊन २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास सहायक फौजदार संजय कराळे करत आहेत.