शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा; जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन; अशी आहे प्रक्रिया! अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहार २०२४-२५ या वर्षासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षासाठी मृग बहारामध्ये चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ, डाळिंब, मोसंबी आणि संत्रा अशा सात फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे कुळ, भाडे, पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत. सन २०२४-२५ पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्क्यापर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून ३५ टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकरी यांनी ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचे आहे.
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी किमान ०.२० हेक्टर आणि कमाल ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. अधिसूचित फळपिकांपैकी संत्रा, मोसंबी व डाळिंब अशा एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार यापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय आहे. विमा क्षेत्र घटक महसूल मंडळ राहील. फळपिक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. तसेच विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू दि. २५ जून २०२४, मोसंबी, चिकू दि. ३० जून २०२४, डाळिंब दि. १४ जुलै २०२४, सीताफळ दि. ३१ जुलै २०२४ आहे.
शेतकऱ्यांची कर्जदार व बिगर कर्जदार विमा हप्त्याची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संबंधीत विमा कंपनीस हस्तांतरित करणे व एकत्रित विमा घोषणापत्रे आणि विमा प्रस्ताव व्यापारी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेकडून संबंधीत विमा कंपनीस सादर करणे आणि पिक विमा योजनेच्या संकेतस्थळावर पीएमएफबीवाय पोर्टलवर योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याची माहिती नोंदविण्याचा अंतिम मुदत योजनेतील शेतकरी सहभागाच्या अंतिम दिनांकानंतर १५ दिवसाच्या आत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेची किंवा क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.