बायकोने पुन्हा दुसरे लग्न केले... दागिने घेऊन फरार!, पतीचे आर्जव

 
औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी तिच्याशी लग्न झाले. दिवाळीसाठी ती माहेरी गेली तर पुन्हा परतलीच नाही. माहेरी गेल्यानंतर ती फरारी झाली. तिच्या प्रियकराशी नोंदणी पद्धतीने तिने लग्न केल्याचे त्याला समजले. याप्रकरणी त्याने पोलीस ठाणे गाठून तरुणीविरुद्ध तक्रार दिली आहे.

आशिष महावीर मोगल (३१, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. औरंगाबाद) या युवकाचे ७ ऑक्टोबर २०२१ रोजी विष्णूनगर औरंगाबाद येथील रिद्धी सूर्यकांत घोंगडे (२१) हिच्याशी लग्न झाले होते. यावेळी वडिलोपार्जित १५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आशिषने रिद्धीच्या अंगावर घातले होते. लग्नानंतर दोघे पती पत्नी बिडकीन येथे राहत होते. १५ नोव्हेंबर रोजी रिद्धी दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती.

त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी ती माहेरच्या घरून कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली. २९ नोव्हेंबर रोजी तिने सुरज धनाजी गायकवाड (रा. काटीगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या तरुणासोबत नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे आशिषला समजले. १५ तोळे दागिने घेऊन व लग्न झालेले असताना दुसऱ्याशी लग्न करून तिने विश्वासघात केल्याची तक्रार आशिषने पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी  रिद्धीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.