व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यात ३४२ ठिकाणी आंदोलन ! मुख्यमंत्री म्हणतात.. आंदोलन करू नका, मी प्रश्न सोडवतो;

प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले, जोपर्यंत जीआर काढत नाही तोपर्यंत आंदोलनाचे पुढील टप्पे होतीलच.. 
 
मुंबई
मुंबई (लाइव्ह ग्रूप नेटवर्क): पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना घेवून राज्यभरात व्हॉईस ऑफ मीडियाने लाक्षणिक उपोषण करून राज्य सरकारला पत्रकारांसाठी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ३४२ ठिकाणी पत्रकार रस्त्यावर उतरले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनामध्ये हजारो पत्रकार रस्त्यावर उतरले होते. या मागण्यांसंदर्भात व्हॉईस ऑफ मीडियाचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. एकनाथ शिंदे यांनी मी या विषयावर तोडगा काढतो, तुम्ही पुढचे आंदोलन करू नका, असे शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधतांना जोपर्यंत जीआर निघणार नाही तोपर्यंत आंदोलनाचे ठरलेले टप्पे कायम असतील, असे ठरवण्यात आले.
   प्रिंट, टीव्ही, सोशल मीडिया, रेडिओ या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या पत्रकारांच्या मागण्या घेऊन गेल्या दोन वर्षापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून राज्यात हे आंदोलन झाले. सगळ्या विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसील, उपविभागीय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयाच्या समोर एक दिवसीय आंदोलन करत त्यांना निवेदन देण्यात आले. राज्यपातळीवरच्या वेगवेगळ्या बारा मागण्या आणि स्थानिक पातळीवरच्या सहा ते सात मागण्या याबाबत निवेदन त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
 
  ३४२ ठिकाणी हे आंदोलन झाले. आज आंदोलनासंदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाने भेट घेत, सविस्तरपणे चर्चा केली. पत्रकारांच्या या मागण्यांसंदर्भातला जीआर जो पर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलनाचे पुढचे टप्पे असेच सुरू राहतील, असे शिष्टमंडळामध्ये असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पत्रकारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे मार्ग काढतो. या विषयाच्या अनुषंगाने मी बैठक बोलवतो. आपण पुढचे होणारे आंदोलन टाळावे. पत्रकार हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला मी, माझे सरकार कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. पत्रकारांच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने मीच पुढाकार घेतला आहे. आमचे सरकार पत्रकारांचे हित जोपासणारे आहे. असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ही ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या शिष्टमंडळांने पुढच्या टप्प्यामधले आंदोलन करायचेच असे ठरवले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले जोपर्यंत शासन मागण्यांबाबत जीआअर काढत नाही, मिटिंग बोलवत नाही, तो पर्यंत हे आंदोलन ठरल्याप्रमाणे असेच सुरू राहील असे सांगत, काल हे आंदोलन तहसीलसमोर झाले, येत्या काही दिवसांत मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन करू असे सांगितले.
 या शिष्टमंडळामध्ये राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, मुख्य संयोजक तथा प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र थोरात यांचा समावेश होता. पुढच्या आंदोलनाची दिशा लवकरच ठरणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली.