पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाभर धरणे आंदोलन! बुलडाण्यात भाईजी चांडक यांनी दिला आंदोलनाला पाठिंबा

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून देशभर आपली ओळख निर्माण करणारी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आता खऱ्या अर्थाने पत्रकारांचा बुलंद आवाज बनली आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना थेट कृती कार्यक्रम राबविणाऱ्या या संघटनेने आता पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. ११ मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात देखील सर्व तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
 

व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात ११ मे रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातही सर्व तालुक्यांत आंदोलन झाले. जिल्हामुख्यालयी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात व साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, या मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण जैन व सिद्धेश्वर पवार यांनी पत्रकारांच्या मागण्या आणि समस्यांबाबत माहिती दिली. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनीही स्वत: या आंदोलनात सहभागी होत पत्रकारांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत या आंदोलनास पाठिंबा दिला. या धरणे आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारी, शहर कार्यकारिणी, तालुका आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्यने सहभागी झाले आहे. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांना निवेदन सादर करण्यात आले.