केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधवांनी घेतले श्री. श्री रविशंकर यांचे आशीर्वाद! आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर म्हणाले,
देशाच्या जनतेचे आरोग्य जपण्याला प्राथमिकता देणार! गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर...
Jun 11, 2024, 09:17 IST
नवी दिल्ली(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणल्यानंतर प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. ना. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. शिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून देखील ते कामकाज सांभाळणार आहेत. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर ना.प्रतापराव जाधव यांनी अध्यात्मिक गुरू श्री.श्री रविशंकर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलतांना देशातील जनतेचे आरोग्य जपण्याला प्राथमिकता देणार असल्याचे ना.जाधव म्हणाले.
देशातील जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देऊ. गोरगरीब जनता आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार असल्याचे ना.जाधव म्हणाले. आयुष मंत्रालयाअंतर्गत भारताच्या प्राचीन आणि गौरवशाली उपचार पद्धतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम करणार असल्याचेही ना.जाधव म्हणाले. अध्यात्मिक गुरू श्री.श्री रविशंकर यांनीही खा.प्रतापराव जाधव यांना लोकाभिमुख कार्य करण्यासाठी आशीर्वाद दिले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या धर्मपत्नी सौ.राजश्री जाधव, जावई सोहम वायाळ, मुलगी नम्रता वायाळ, मुलगा ऋषिकेश जाधव, ना.जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ.गोपाल डीके,राहुल सोळंकी आदींची उपस्थिती होती.