१९ वर्षीय तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार; मित्रानेच फ्‍लॅटवर बोलावून केला घात!

 
rape
पुणे ः फ्लॅटवर बोलावून १९ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केला. तिची नग्न छायाचित्रे काढली. ती घरी जात असताना काढलेली नग्न छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन परत फ्‍लॅटवर बोलावले. तिथे दोन मित्रांना त्‍याने आधीच बोलावून घेतले होते. त्‍यांनीही तिच्या शरीराचे लचके तोडले. ही संतापजनक घटना पुण्यात पिपरी चिंचवड भागातील पिंपळे गुरवच्या देवकर पार्क परिसरात समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तिसरा आरोपी अद्याप फरारी आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रथमेश ऊर्फ सनी खैरे याची तरुणीसोबत चांगली दोस्ती होती. तीही मित्राच्या नात्याने त्याच्यावर विश्वास ठेवायची. १५ डिसेंबरला सनीने तिला त्याच्या फ्लॅटवर बोलावले. ती फ्लॅटवर गेल्यावर सनीने तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. तिची नग्न छायाचित्रे काढली. त्यानंतर तरुणी घराकडे जात असताना सनीने तिला पुन्हा फोन करून फ्लॅटवर बोलावले. तिने नकार दिला असता तिचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणी पुन्हा सनीच्या फ्लॅटवर पोहोचली. ती पोहोचण्यापूर्वीच तिथे सनीचे दोन मित्र पोहोचले होते. त्यातील स्वराज कदम हा तरुणीच्या ओळखीच्या होता. दुसऱ्याला मात्र ती ओळखत नव्हती. तिघांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सनी आणि स्वराज कदम याला अटक केली असून तिसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.