ट्रॅक्‍टरवर ड्रायव्हर ठेवलेल्या तरुणाची शेतकऱ्याच्या मुलीवरच वाईट नजर; घरातून पाच लाख घेऊन दोघे पसार!

 
अपहरण
हिंगोली : ट्रॅक्‍टरवर ड्रायव्हर ठेवलेल्या तरुणाने शेतकऱ्याच्या विश्वासाचा घात केला. त्‍यांच्याच १४ वर्षीय मुलीवर त्‍याची वाईट नजर पडली. ती प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्‍याने तिच्यासह घरातून पाच लाख घेऊन पलायन केले. हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी गावात ही घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी नोकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

वैभव मुलगंडे हा तरुण गावातीलच एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता. शेतकऱ्याच्या कुटूंबाचा त्याच्यावर पक्का विश्वास बसला होता. त्यातून तो नेहमी घरी येजा करत होता. यातूनच शेतकऱ्याच्या मुलीसोबत वैभवची जवळीक वाढत गेली. मुलीचे वडील व काका कामानिमित्त हिंगोलीला गेले होते तेव्हा वैभव त्यांना हिंगोलीत दिसला.

तेव्हा मामाच्या गावाला जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर काहीच वेळात मुलगी घरी नसल्याचा फोन शेतकऱ्याला आला. त्यावर असेल कुठेतरी, येईल घरी... असे सांगून शेतकऱ्याने फोन कट केला. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा पत्नीने फोन करून घरात ठेवलेले ५ लाख २० हजार रुपयेसुद्धा दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्याने चालक वैभवला फोन करून घडलेली घटना सांगितली व तू कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर हिंगोलीत आहे, असे उत्तर वैभवने दिले. त्यानंतर गावात गेल्यानंतर त्यांनी पुन्हा वैभवला फोन केला असता वैभवचा फोन बंद येत होता.

मुलीचा सुद्धा शोध लागत नव्हता. वैभवला दुपारी २ वाजता गावातच पाहिल्याचे शेजारचे सांगत होते. मुलीचे नातेवाइक, मित्रमंडळी सगळीकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. वैभवसुद्धा गावात नसल्याने वैभवनेच माझ्या मुलीला फूस लावून पळवुन नेले व घरातील ५ लाख २० हजार रुपये लंपास केले, अशी तक्रार शेतकऱ्याने पोलिसांत दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नोकर वैभवविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.