लग्नाचे डोहाळे लागले पण मध्येच हे काय घडलं...

मराठी मॅट्रिमनीवर त्‍याला पाहिलं, प्रेम झालं, जळगाव जिल्ह्यातील घटना
 
 

जळगाव : मराठी मॅट्रिमनी साईटवर अनेक फेक प्रोफाइल असतात. मोठमोठ्या गोष्टी टाकून मुलींना आकर्षित केले जाते. अशाच एका जाळ्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील ३१ वर्षीय युवती फसली. त्‍यानं तिला मोठमोठी स्वप्न दाखवली. प्रेमाच्या गुजगोष्टी वेगवेगळ्या नंबरवरून सुरू झाल्या... लग्न कधी अन्‌ कसं करायचं याच्या चर्चा सुरू झाल्या अन्‌ एक दिवस तिच्यासोबत वेगळीच घटन्‍ाा घडली आणि तिने डोक्‍यावर हात मारून घेतला!

झालं असं की, या युवतीचा मराठी मॅट्रिमनीवर निवांत चित्रे नावाच्या तरुणासोबत संपर्क झाला. तिला तो आवडला. त्‍यानेही सलगी केली. तिने ती वाढवू दिली. दोघांतील संवाद कॉलवर सुरू झाला. प्रेम वाढत जात असताना लग्नाचेही प्लॅनिंग सुरू झाले. याचदरम्‍यान त्‍याने तिला सांगितले, की परदेशातून एक पार्सल पाठवले असून, त्यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किंमत एक कोटी रुपये आहे या वस्तू त्‍या पार्सलमध्ये आहे. कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय दिल्ली विमानतळावर पार्सल मिळणार नाही,असेही तो म्‍हणाला. हे पार्सल सोडविण्यासाठी त्‍याने ४ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरच्या काळात २ लाख ५५ हजार ५०० रुपये ऑनलाइन घेतले. नंतर त्‍याने फोन करणे बंद केले अन्‌ ती लावायला गेली तर लागतच नव्‍हता. पार्सलही आले नाही आणि तोही आला नाही. त्‍यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव युवतीला झाली. तिने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्‍या भामट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करत आहेत.