दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता ! पेपर तपासण्यास शिक्षक संघटनांचा नकार

 
Ghfg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे.

न्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी काल, १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका दहावी बारावीच्या परीक्षा आणि निकालांना बसणार का ? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मागील महिन्यात देखील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर आणि कामावर बहिष्कार घातला होता. आताही १४ मार्चपासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात आलाय. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे बारावी - दहावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.